आता बनणार कृत्रिम गर्भाशय, रोबो होणार दाई! | पुढारी

आता बनणार कृत्रिम गर्भाशय, रोबो होणार दाई!

बीजिंग : बाळाच्या जन्मापासून ते बाळ मोठे होण्यापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेला आता ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चीनच्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे की काही वर्षांनंतर भ्रूण कृत्रिम गर्भाशयात वाढेल आणि त्याच्या जन्मानंतर रोबो दाईची भूमिका पार पाडेल.

जगातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या चीनमध्ये एकेकाळी ‘एकच अपत्य’ हे धोरण अत्यंत कडकपणे राबवण्यात आले होते. मात्र, आता हाच देश घटत्या जन्मदराने चिंतीत झाला आहे. येथील जन्मदर गेल्या सहा दशकांच्या सर्वात खालच्या स्तरावर आला आहे. या समस्येला दूर करण्यासाठीच चिनी संशोधक ‘एआय’वर आधारित तंत्र विकसित करीत असल्याचे म्हटले जात आहे. चीनच्या शुझोऊ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या वैज्ञानिकांनी दावा केला आहे की भ्रूणावस्थेपासून ते बाळ मोठे होईपर्यंत त्याची संपूर्ण देखभाल आर्टिफिशियल इंटेलिजन्स असलेली दाई (एआय नॅनी) करील. एखाद्या महिलेस बाळाला नऊ महिने गर्भात ठेवण्याची गरज भासणार नाही.

त्यामुळे गर्भधारणेच्या काळात निर्माण होणार्‍या समस्याही दूर होतील. कृत्रिम गर्भाशयात बाळ मोठे होत असताना आई पाहू शकेल. याबाबत सध्या उंदरांवर प्रयोग केले जात आहेत. या कृत्रिम गर्भाशयातील भृणांवर ‘एआय दाई’ लक्ष ठेवत आहे.

संबंधित बातम्या
Back to top button