बीड : पालेभाज्या झाल्या कवडीमोल, शेतकरी हवालदिल  | पुढारी

बीड : पालेभाज्या झाल्या कवडीमोल, शेतकरी हवालदिल 

गजानन चौकटे, पुढारी वृत्तसेवा : महिन्याभरापूर्वी आकाशाला भिडलेल्या भाजीपाल्याच्या किमती आठवडी बाजारात भाजीपाल्याची आवक जास्त प्रमाणात आल्याने भाव घसरले आहेत. व्यापाऱ्यांना कमी किमतीत भाज्या विकाव्या लागत आहेत. त्यामुळे व्यापारी हैराण झाले आहेत. दुसरीकडे शेतकऱ्यांनाही त्यांच्या मेहनतीचा किमान मोबदला मिळेनासा झाला आहे. त्यामुळे त्यांचंही मोठ नुकसान झालं आहे.

बटाटे, मेथीचे दर आज आठवडी बाजारात फारच घसरले होते. बटाटे महिन्याभरापूर्वीच ३० रूपये किलोने विकणारे आता १५ रूपये किलोंवर आले होते. तर प्लाॅवर, कोबी ३० रूपये किलो दराने विक्री होत असल्याचे भाजीपाला विक्रेते रफिक बागवान यांनी सांगितले

हिवाळा म्हणजे आरोग्यासाठी लाभदायक असतो आणि यामध्ये भाजी पाल्याचे दर घसरल्याने गृहिणीचे बजेट मात्र समाधानकारक आहे. थंडी सुरू होताच भाजीपाल्याच्या किमती वाढत असतात. परंतु, गेवराईच्या बाजारपेठेत अधिक प्रमाणात भाजी आल्याने भाजीपाल्याची कवडीमोल भावात विक्री होताना गेवराईच्या आठवडी बाजारात दिसली.

१५ दिवसांपूर्वी भाजीपाल्याचे भाव वाढले होते. त्यामुळे गरिबांनी खायचं काय? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र  विविध भागातून भाजीपाल्याची आवक वाढल्याने दर खाली आले आहेत. आठवडी बाजारात बटाटे १५ रुपये किलो टोमॅटो चवळी शेंगा २० रुपये, भेंडी ६० रुपये ढोबळी, मिरची, कारली वांगी 40 ते 50 रुपये किलो दराने विकली गेली. पालक आणि  कोथिंबीरीचे दहा रुपयांत ६ जोडी विक्री सुरू होते. आवक वाढल्याने दर उतरल्याचे कोल्हेर येथील शेतकरी राधाकिसन माळतकर यांनी सांगितले.

हिवाळ्याच्या सुरूवातीला प्रतिकिलो ५०० रूपये दराने विकणारी शेंवगा शेंगा अजूनही महागच आहेत. बुधवारी बाजारात १०० रूपये दराने विकल्या गेल्या. तर हिरवी मिर्ची ८० रूपये किलो दराने तर मटार ४० ते ५० रूपये किलो दराने विक्री झाली.

Back to top button