नगर : पारनेर तालुक्यातील जवळ्यात रंगला बैलगाडा शर्यतीचा थरार | पुढारी

नगर : पारनेर तालुक्यातील जवळ्यात रंगला बैलगाडा शर्यतीचा थरार

जवळा (जि. अहमदनगर ), पुढारी वृत्तसेवा :  सर्वोच्च न्यायालयाने काही अटीशर्ती घालत बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली आहे.  या नंतर जिल्ह्यात प्रथमच पारनेर तालुक्यातील जवळा येथे बुधवारी शर्यतींचा थरार पाहावयास मिळाला. तब्बल चार वर्षांनंतर झालेल्या बैलगाडा शर्यतींचा मनसोक्त आनंद जवळेकरांनी लुटला.

ग्रामदैवत श्री धर्मनाथ महाराज यात्रेत एकाच दिवसात दीडशे बैलगाडे धावले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व बैलगाडा शर्यतींना सरकारची बंदी असल्याने यात्रेकरूंना व बैलगाडा मालकांच्या आनंदावर गेल्या तीन वर्षांत विरजण पडले होते. परंतु, यंदा मात्र न्यायालयाने बैलगाडा शर्यतीच्या अटीशर्ती शिथिल केल्याने तालुक्यात तीन वर्षातून प्रथमच मोठ्या प्रमाणात बैलगाडे धावल्याने जवळेकरांनी या शर्यतीचा आनंद लुटला.

जवळा ग्रामस्थांनीही बैलगाडा मालकांना भरघोस बक्षिसे देऊन खुश करत मानसन्मान दिला. खेड, शिरूर, आंबेगाव, संगमनेर, पारनेर तालुक्यातील अनेक नामवंत गाडा मालकांनी यात्रेस हजेरी लावली. काल माघ शुद्ध द्वितियेला ग्रामदैवत धर्मनाथ महाराजांच्या मूर्तीस ग्रामस्थांनी अभिषेक करत रिती रिवाजाप्रमाणे पूजा विधी करून मंदिर दर्शनासाठी भाविकांना खुले करण्यात आले. दोन दिवस चालणार्‍या या यात्रेत रात्री लोकांच्या मनोरंजनासाठी आनंद लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम ठेवण्यात आला असून हजेरीचा कार्यक्रम होऊन दुपारी कुस्त्याच्या आखाड्याने यात्रेची सांगता होणार आहे.

हे ही वाचलं का  

Back to top button