Rahul Ganhi : काॅंग्रेसने दिलेले रोजगार भाजपने हिरावून घेतले; राहुल गांधींचा घणाघात | पुढारी

Rahul Ganhi : काॅंग्रेसने दिलेले रोजगार भाजपने हिरावून घेतले; राहुल गांधींचा घणाघात

पुढारी ऑनलाईन डेस्क :  देशाचे सध्या दोन भागात विभाजन झाले आहे. पंरतु, याचा उल्लेख सत्यतेचा अभाव असलेल्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणात नव्हता. सध्या धनाढ्यांच्या हिंदुस्तान आणि गरीबांचा हिंदुस्तान यामधील दरी वाढत आहे, अशी भावना कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी बुधवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा करतांना लोकसभेत व्यक्त केली. यादरम्यान सत्ताधारी तसेच विरोधकांमध्ये शाब्दिक खटके उडतांना दिसून आले.

रोजगाराच्या शोधात असलेल्या उत्तर प्रदेश, बिहारमधील युवकांनी रेल्वेच्या नोकरीसाठी काय केले? देशातील युवकांकडे रोजगार नाही. याबद्दल राष्ट्रपतींच्या भाषणात उल्लेख नव्हता. सर्वच ठिकाणी युवक रोजगार मागत आहेत. पंरतु, सरकार असमर्थ आहे, अशा शब्दात राहुल गांधी यांनी बेरोजगारीच्या मुद्दयावर बोट ठेवले.

गेल्‍या तीन वर्षांमध्ये कोट्यवधी युवकांचा रोजगार हिरावून घेण्यात आला. २०२१ मध्ये तीन कोटी युवकांनी रोजगार गमावला. ५० वर्षांतील सर्वाधिक बेरोजगारी आज देशात आहे. ‘मेक इन इंडिया’ संबंधी सरकार बोलते पंरतु, युवकांना रोजगार मिळत नाही. देशात ही स्थिती कशी उत्पन्न झाली? दोन हिंदुस्तान कसे निर्माण झाले? रोजगार,लघु-मध्यम उद्योग आणि इन्फॉर्मल सेक्टरपासून लाखो-कोट्यवधी रूपये हिरावून घेत देशातील बड्या अरबपतींच्या घशात घातले. लघु-मध्यम उद्योगांवर एकापाठोपाठ एक हमले करण्यात आले. नोटबंदी, चुकीच्या पद्धतीले जीएसटी अंमलबजावणी तसेच कोरोना काळात गरीबांना जी मदत देणे आवश्यक होते ती त्यांना आपण देवू शकले नाही. ८४% भारतीयांचे उत्पन्न त्यामुळे घटले आणि ते वेगाने गरीबीच्या गर्तेत अडकत आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

कॉंग्रेस सरकारने गेल्या साठ वर्षामध्ये २७ कोटी लोकांना गरीबीच्या दरीतून बाहेर काढले.पंरतु, २३ कोटी लोकांना तुम्ही पुन्हा गरीबीच्या दरीत ढकलले आहे.फॉर्मल सेक्टर मध्ये एकाधिकारशाही निर्माण करण्यात आली आहे. सर्वात मोठे दोन एकाधिकारशाहीवादी आहेत. कोरोनाच्या काळात वेगवेगळे व्हेरियंट आले. हे दोन वेगळे-वेगळे व्हेरियंट देशाच्या अर्थव्यवस्थेत पसरत आहेत. सर्व बंदरे, विमानतळ, उर्जा, ट्रान्समिशन, खाणी, हरित उर्जा, गॅस, एडिबल ऑईल क्षेत्रात आता अडानी दिसून येतात. दुसरे टेलिकॉम, पेट्रोकेमिकल तसेच ई-कॉमर्स मध्ये एकाधिकारशाही देण्यात आली आहे. यासाठी सर्व संपत्ती यांच्याच हाती एकवटत आहे. इन्फॉर्मल सेक्टरला प्रोत्साहन दिले असते तर दोन हिंदुस्तान बनले नसते. पंरतु, सरकारने असंघटित क्षेत्रासह सुक्ष्म,लघु, उद्योगांना संपुष्टात आणल्याचे राहुल गांधी म्हणाले.

उत्पादन क्षेत्रातील रोजगारात गेल्या पाच वर्षात घट झाली आहे.आज देशातील १०० सर्वाधिक धनाढ्यांच्या हाती देशातील ५५ कोटी नागरिकांहून अधिक संपत्ती आहे. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. संघराज्यात तामिळनाडूतील नागरिकांनादेखील उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांना देण्यात येणार्या प्राथमिकता मिळायला हवी. मणिपूर, नागालॅड, जम्मू-काश्मीर ला देखील प्राथमिकता मिळायला हवी, असे राहुल गांधी म्हणाले.

हे ही वाचलं का  

Back to top button