शिक्षणाच्या ‘सिंधुदुर्ग पॅटर्न’चा महाराष्ट्रात डंका! | पुढारी

शिक्षणाच्या ‘सिंधुदुर्ग पॅटर्न’चा महाराष्ट्रात डंका!

सिंधुदुर्ग : गणेश जेठे
कोकणच्या लाल मातीतच कुशाग्र बुद्धिमत्तेची बिजे रोवली गेली आहेत, असे आजवरच्या शैक्षणिक गुणवत्तेच्या गगनचुंबी आलेखानुसार ठामपणे म्हणता येईल. कोकणची भूमी ही बुद्धिवंताची भूमी असे म्हटले जाते आणि ते सत्यही आहे. गेली बारा वर्षे तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याने दहावी आणि बारावी शालांत परीक्षेत जी गगनभरारी घेतली आहे ती अख्ख्या महाराष्ट्राची डोळे दिपवणारी आहे. या भरारीतूनच ‘शिक्षणाचा सिंधुदुर्ग पॅटर्न’ निर्मित झाला आहे. याच पॅटर्नचा संपूर्ण महाराष्ट्रात डंका आहे.

यापूर्वी गेली अकरा वर्षे सलग सिंधुदुर्ग जिल्हा दहावी परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकाविणारा जिल्हा म्हणून प्रसिद्धीस पावला होता. याहीवेळी सिंधुदुर्ग जिल्हा गगनभरारी घेईल आणि राज्यात पुन्हा एकदा नंबर वन ठरेल अशी अपेक्षा आणि आत्मविश्वास सिंधुदुर्गवासीयांना आणि जिल्ह्यातील शिक्षणप्रेमींना होती. ही अपेक्षापूर्ती पूर्ण झाली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शैक्षणिक गुणवत्तेतील हे यश पाहून महाराष्ट्राचे डोळे विस्फारले. अगदी गेल्या आठवड्यात लागलेल्या बारावी परीक्षेच्या निकालातही सिंधुदुर्ग जिल्ह्याने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविला होता. तोसुद्धा गेली अकरा वर्षे सलग सिंधुदुर्ग जिल्ह्याने महाराष्ट्रात सर्वात पुढे राहण्याचा विक्रम नोंदला आहे.

काय आहे हा सिंधुदुर्ग पॅटर्न?…

गुणवत्तेतील उंच भरारीचे रहस्य भक्कम पायामध्ये आहे. सिंधुदुर्ग जिल्हा 1991 सालच्या आसपास संपूर्ण देशातला पहिला साक्षर जिल्हा म्हणून उदयास आला होता. याचाच अर्थ या जिल्ह्यात शिक्षणाचा दिवा गावागावातील घराघरात तिथपासून पेटतो आहे. तो आता अधिक प्रज्वलीत झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घराघरातील प्रत्येक स्त्री शिक्षित आहे. कागदावरचे अंगठ्यांचे ठसे केव्हाच गायब झाले आहेत. इथल्या घरातला प्रत्येक पालक सुशिक्षित आहे आणि तो शिक्षणप्रेमी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याची शिक्षण क्षेत्रातील सकारात्मक प्रशासकीय व्यवस्था या यशामागचे सर्वात मोठे कारण आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याची लोकसंख्या 8 लाख 50 हजार इतकी आहे. 431 ग्रामपंचायती आहेत. छोट्या लोकसंख्येची गावे आहेत. तरीदेखील एका गावात सरासरी तीन ते चार प्राथमिक शाळा आहेत.

पालक आणि शालेय व्यवस्थापन समित्या यांचा शैक्षणिक गुणवत्तेतील प्रत्यक्ष सहभाग प्रभावी आहे. एखादी शिक्षिका शाळेत उशिरा येत असेल तर एखादा पालक ‘बाई वाजले कीती?’ असा प्रश्न हिंमतीने विचारतो. पालकांच्या या जागृृतीमुळे शिक्षक कधीही शाळेत उशिरा येण्याची आणि वेळेच्या अगोदर घरी जाण्याचे धाडस करत नाही. शिक्षण विस्तार अधिकारी असो किंवा केंद्रप्रमुख असो ठरलेल्या कालावधीत शाळेत जावून मुलांची परीक्षा घेण्यास कधीही कुचराई करत नाही. एका बाजुने वरिष्ठ अधिकारी आणि दुसर्‍या बाजुने जागरूक पालक आपल्याला जाब विचारतील या भीतीपोटी शिक्षक मुलांच्या गुणवत्तेकडे डोळ्यात तेल घालून लक्ष देत असतात.
जवळपास 238 माध्यमिक शाळा जिल्ह्यात आहेत. आपल्या शाळेत मुले यावीत, आपल्या शाळेचे नावलौकीक जिल्ह्यात व्हावे या अपेक्षेने केवळ शिक्षकच नाहीत तर शिक्षण संस्थांचे पदाधिकारीसुध्दा जीव ओतून काम करतात. आपल्या शाळेचा निकाल 100 टक्के लागावा यासाठी जीवाचे रान करतात. एकेका मुलावर लक्ष ठेवतात. एखादं मुल नापास होईल किंवा मागे पडेल असे जेव्हा वाटते तेव्हा शाळेतले शिक्षक आणि संस्थेचे पदाधिकारी अशा मुलांच्या पालकांना बोलावून त्यांना सतर्क करतात. शिक्षकही अशा मुलांवर अधिक लक्ष देतात. अशा मेहनतीमुळेच 238 पैकी 197 शाळांचा दहावीचा निकाल 100 टक्के इतका लागला आहे.

मुलाने शाळेत प्रवेश केला की त्याच्या मनावर आपल्याला खुप शिकायचे आहे आणि मोठे व्हायचे आहे असे संस्कार पालकांकडून बिंबवले जातात. फारसे नसणारे शहरीकरण, त्यामुळे फारशी नसणारी मनोरंजनाची साधने यामुळे मुलांना अभ्यास करण्यासाठी शांत आणि मोकळे वातावरण उपलब्ध होते. त्याशिवाय पालकांमध्ये आईवडीलांपैकी एखादी व्यक्ती नोकरी तर शक्यतो आई घरीच असते. अर्थातच ती शिकलेली असल्यामुळे मुलांचा वेळात वेळ काढून अभ्यास घेते. घरातून सुरू झालेला शैक्षणिक गुणवत्तेचा हा आलेख म्हणूनच गगनचुंबी बनला आहे.

 

ग्रामीण कोकणातील मुलांची गुणवत्ता वाढण्यामागे नियमित अभ्यास करण्यावर दिला जाणारा भर आणि करिअरकडे अधिक गांभीर्याने बघण्याचा दृष्टीकोन यामुळेच गेल्या 10 वर्षात कोकणचे शैक्षणिक विश्व पुर्णपणे बदलले आहे. कोकण एक सकारात्मक कायापालट करण्याच्या भूमिकेत नवी पिढी आहे. मी स्वतः करूळ गावात एक माध्यमिक शाळा चालवतो. तेथील विद्यार्थी आणि शिक्षकांचा सकारत्मक अनुभव पाहतो आहे. पुढील 10 वर्षात शैक्षणिक क्षेत्रात कोकण एक संपन्न भूमी होईल, असा माझा आशावाद आहे. उत्तम गुणवत्ता दाखविणार्‍या शिक्षकांचे, शाळांचे आणि विद्यार्थ्यांचेही मनपूर्वक अभिनंदन करतो.
-मधु मंगेश कर्णिक ज्येष्ठ साहित्यिक

शिक्षक आणि संस्थाचालकांची मेहनत कारणीभूत : शशिकांत अणावकर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील यशस्वी ठरलेल्या पणदूर हायस्कूलचे संस्थाचालक शिक्षणतज्ज्ञ शशिकांत अणावकर हे पेशाने शिक्षक आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, शिक्षक मुलांवर जास्त काम करतात. किंबहुना संस्थाचालक शिक्षकांकडून आवश्यकते काम करून घेतात. मुळात शिक्षण संस्थेचे पदाधिकारीच शिक्षणप्रेमी असल्यामुळे आपल्या शाळेतील कोणतेही मूल मागे राहू नये याकडे बारकाईने लक्ष देतात. एखाद्या परीक्षेत एखादे मूल मागे पडले तर ते का मागे पडले याचे कारणमिमांसा केली जाते. त्यावर उपाय केला जातो आणि त्या मुलावर अधिक मेहनत घेवून गुणवत्तेचा प्रवाहात आणले जाते.

 

कोकणातील विद्यार्थी हा अभ्यासू व मेहनती आहे. शहरीकरणातील दुष्परिणाम त्याच्यापर्यंत पोहोचलेले नाही. त्यामुळे शिस्तप्रियता या विद्यार्थ्यांमध्ये प्रामुख्याने दिसते. त्यातूनच हा शिक्षणाचा नवा पॅटर्न तयार होत आहे, याचा मला आनंद आहे. विद्यार्थ्यांचे मनोवैज्ञानिक विश्लेषण करून शिक्षणाच्या नियमित अभ्यासक्रमामध्ये त्यांचे मन रुजवणे या कामात तेथील शिक्षक यशस्वी होत आहेत, हाच याचा अन्वयार्थ आहे. मी यशस्वी विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन करतो.
डॉ. भालचंद्र मुणगेकर
शिक्षणतज्ज्ञ, माजी कुलगुरू मुंबई.

Back to top button