वाढतच चाललाय ‘पाताळाचा रस्ता’! नवे संशोधन काय सांगते? | पुढारी

वाढतच चाललाय ‘पाताळाचा रस्ता’! नवे संशोधन काय सांगते?

मॉस्को : रशियाच्या सैबेरियातील सर्वात मोठे पर्माफ्रॉस्ट क्रेटर ‘बटागाइका’ सातत्याने वाढतच चालले आहे. ‘पाताळाचा रस्ता किंवा द्वार’ असे म्हटले जाणारे हे विवर मोठे होत चालल्याचे एका नव्या संशोधनातून समोर आले आहे. पर्माफ्रॉस्ट म्हणजे वर्षानुवर्षे गोठलेली जमीन. या जमिनीत बर्फ, धूळ आणि खडक गोठलेले असतात.

हे पर्माफ्रॉस्ट वितळत असल्याने आता ते दरवर्षी 35 दशलक्ष घनफूट म्हणजेच दहा लाख घनमीटरने वाढत असल्याचे दिसून आले आहे. बटागाइका क्रेटरला सर्वप्रथम 1991 मध्ये रशियाच्या उत्तर याकुतियाच्या याना अपलँडमध्ये एक दरड कोसळल्यानंतर पाहण्यात आले होते. त्यावेळी डोंगराचा एक भाग खाली कोसळला होता. त्यामुळे पर्माफ्रॉस्टचे स्तर उघड झाले, जे तब्बल 6 लाख 50 हजार वर्षांपासून गोठलेले होते. हा सैबेरियाचा सर्वात जुना पर्माफ्रॉस्ट आहे.

वैज्ञानिकांना आता दिसून आले की, बटागे मेगास्लंपच्या खडकाचा दर्शनी भाग पर्माफ्रॉस्ट वितळत असल्याने दरवर्षी 40 फूट म्हणजे बारा मीटरच्या दराने मागे हटत आहे. डोंगराचा कोसळलेला भाग जो हेडवॉलपासून 180 फूट खाली आला होता, तो वेगाने वितळत आहे. 2014 मध्ये मेगास्लंपची रुंदी 790 मीटर होती. त्यानंतर गेल्या दहा वर्षांमध्ये ती 200 मीटर रुंद झाली आहे. बटागेची सॅटेलाईट प्रतिमा, क्षेत्रातील मोजमाप आणि डेटाचे निरीक्षण यांच्या आधारे याबाबतचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

Back to top button