चीनमध्ये बनतो दगडांचा ‘खमंग’ खाद्यपदार्थ! | पुढारी

चीनमध्ये बनतो दगडांचा ‘खमंग’ खाद्यपदार्थ!

बीजिंग : चिन्यांच्या खाद्यसंस्कृतीमध्ये काय काय असेल, याचा आपण अंदाज करू शकत नाही. तिथे ऑक्टोपस, वटवाघूळ, कुत्रा, साप, झुरळ, उंदीर, विंचू हे सर्व काही ‘खाद्यपदार्थ’ या यादीत मोडतात! आता हे पदार्थ कमी होते म्हणून की काय, आता या मंडळींनी चक्क दगड ‘खाण्यास’ सुरुवात केली आहे. या दगडाच्या पदार्थाचा एक व्हिडीओही सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही चिनी लोकांना कांदा आणि लसणाची फोडणी घालून दगड ‘खाताना’ पाहू शकता. हा पदार्थ पाहून खरंच तुम्ही सुद्धा डोक्याला हातच लावाल!

या पदार्थाला ‘स्टोन च्युसू डिश’ असं म्हणतात. हा अनोख्या पदार्थाची सध्या जगभरात चर्चा आहे. ही डिश तयार करण्यासाठी लोक नदीमधील गुळगुळीत दगडगोटे गोळा करतात. मग या दगडांना तेलामध्ये फ्राय केलं जातं. मग त्यावर आलं, लसूण आणि कांदा यांची फोडणी दिली जाते आणि शेवटी विविध प्रकारचे मसाले टाकून तयार होते च्युसू डिश.

हॉटेल्समध्ये हा पदार्थ तब्बल 200 रुपयांना विकला जातो. अर्थात चिनी खवय्ये हे फोडणी दिलेले दगड फक्त चोखतात आणि मग त्या दगडांना घेऊन घरी जातात. या गुळगुळीत दगडांवरील चटकदार मसाला चाटून खाल्ला जातो. असा पदार्थ यापूर्वी कधीच कोणी पाहिला नसेल. पण, चीन हा देश आपल्या अनोख्या पदार्थांमुळे नेहमीच चर्चेत असतो. यापूर्वी ही मंडळी बर्फामध्ये विविध प्रकारचे मसाले टाकून बर्फसुद्धा खात होते!

Back to top button