नव्या इम्युनोथेरपीमुळे रक्त होते अधिक ‘तरुण’ | पुढारी

नव्या इम्युनोथेरपीमुळे रक्त होते अधिक ‘तरुण’

लंडन : संशोधकांनी उंदरांमधील ‘इम्युन एजिंग’ म्हणजे रोगप्रतिकारक क्षमता वृद्ध बनण्याची प्रक्रिया मागे घेण्यात काही यश मिळवले असल्याचे आता दिसून आले. ही नवी इम्युनोथेरपी भविष्यात माणसालाही उपयुक्त ठरू शकेल असे त्यांना वाटते. या पद्धतीमुळे शरीरातील रक्त अधिक ‘तरुण’ बनू शकते.

ही नवी इम्युनोथेरपी एका नैसर्गिक प्रक्रियेला अडथळा आणते. त्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वयोमानाने निर्माण होणार्‍या विशिष्ट पेशीच्या निर्मितीस अडथळा आणते. अरिझोना युनिव्हर्सिटीतील इम्युनोबायोलॉजीचे प्राध्यापक डॉ. जांको झेड. निकोलिच-झुगिच यांनी याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, उंदरावरील प्रयोग केवळ सिद्धांत सिद्ध करणारा आहे. मात्र, या संशोधनाचे महत्त्व आताच सांगणे कठीण आहे. अर्थातच यासाठी आणखी संशोधनाची गरज आहे.

रोगप्रतिकारक क्षमतेला अधिक तरुण, चांगल्या स्थितीत आणण्यासाठी ही थेरपी किती प्रभावी आहे हे अजून अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्यावे लागणार आहे. याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘नेचर’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. संशोधकांनी या थेरपीचा वापर 18 ते 24 महिन्यांच्या उंदरांवर केला. त्यांचे हे वय मानवी वयाच्या हिशेबात 56 ते 69 वर्षांचे आहे. या उंदरांवर थेरपीचा चांगला परिणाम झाल्याचे त्यांना दिसून आले. हा परिणाम दोन महिने टिकून राहिला. या काळात संबंधित उंदरांमध्ये तुलनेने अधिक टी-सेल्स आणि परिपक्व बी-सेल्स निर्माण झाल्या.

Back to top button