एकेकाळी पृथ्वीवर वीस लाख वर्षे पडत होता पाऊस! | पुढारी

एकेकाळी पृथ्वीवर वीस लाख वर्षे पडत होता पाऊस!

लंडन : आपली धरती नेहमीच रहस्यांनी भरलेली आहे. आपण जितके तिची संरचना समजण्यासाठी खोलात जाऊ लागतो तितके ती आपल्याला आश्चर्यचकित करते. पृथ्वीच्या इतिहासातील एक काळ तर अतिशय थक्क करणारा आहे. त्यावेळी पृथ्वीवर सातत्याने लाखो वर्षे पाऊस कोसळत होता. लाखो वर्षांच्या या पावसानेच आपल्या निळ्या ग्रहावर जीवसृष्टी विकसित होण्यासाठी मदत झाली. वैज्ञानिक आजही ते का व कसे झाले, हे जाणून घेण्यासाठी प्रयत्न करतात. त्या काळात वीस लाख वर्षे पृथ्वीवर पाऊस पडत होता!

वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार वीस ते तीस कोटी वर्षांपूर्वी आपली पृथ्वी एक वेगळेच ठिकाण होते. त्यावेळी आतासारखे वेगवेगळे खंड नव्हते, तर एकच अखंड भूमी होती. त्यावेळी एक टप्पा असाही होता, ज्यावेळी सुमारे दहा ते वीस लाख वर्षे सातत्याने पाऊस पडत होता. संशोधकांनी सन 1970 ते 80 च्या दशकात काही प्राचीन खडकांमध्ये जमा झालेल्या असामान्य स्तरांचा शोध लावला होता. हे स्तर सुमारे 23 कोटी वर्षांपूर्वीचे होते. संशोधकांच्या एका टीमने पूर्व आल्प्समध्ये कार्बोनेट संरचनांमध्ये जमा झालेल्या सिलिक्लास्टिकच्या एका स्तराचे अध्ययन केले. अन्य एका टीमने ब्रिटनच्या प्रसिद्ध लाल दगडामधील एंबेडेट ग्रे खडक स्तराचे विश्लेषण केले.

या दोन संशोधनांचे निष्कर्ष आणि जगाच्या वेगवेगळ्या भागांमधील अन्य संशोधनांमधून एक समान बाब समोर आली. पृथ्वीच्या इतिहासात एक काळ असा होता ज्यावेळी पृथ्वीवर दीर्घकाळ दुष्काळ पडला होता आणि नंतर पाऊस सुरू झाला. डायनासोरच्या युगाच्या सुरुवातीस पृथ्वी असामान्य रूपाने आर्द्र होती. या काळाला ‘कार्नियन प्लवियल इव्हेंट’ किंवा ‘कार्नियन प्लवियल एपिसोड’ म्हणून ओळखले जाते. त्यावेळी इतका दीर्घकाळ पाऊस का पडला, हे संशोधक जाणून घेत आहेत. रँगेलिया लार्ज इग्नियस प्रांतात मोठ्या प्रमाणात झालेल्या ज्वालामुखी उद्रेकांमुळे आर्द्रता वाढली, असे त्यांना वाटते. याच कारणामुळे लाखो वर्षे पाऊस पडत होता. जियोलॉजिकल सोसायटीच्या जर्नलमध्ये प्रकाशित एका संशोधनानुसार, आर्द्र काळ डायनासोरसाठी लाभदायक ठरला.

Back to top button