Code of conduct : मतदारांची आचारसंहिता! | पुढारी

Code of conduct : मतदारांची आचारसंहिता!

मिलिंद बल्लाळ, राजकीय अभ्यासक

आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सत्तारूढ पक्ष घोषणांचा सपाटा लावता-लावता, एकापाठोपाठ एक उद्घाटने आणि भूमिपूजनांचे नारळ वाढवत असतो. निवडणुका समीप आल्याचे ते व्यवच्छेदक लक्षण मानले जात असते. मतदारांना प्रभावित करण्यासाठी हा सारा खटाटोप असतो आणि त्यातून आपल्या पारड्यात पडणार्‍या मतांचा हिशेब सुरू होत असतो. (Code of conduct)

Code of conduct : विचारपूर्वक मतदान करेन

निवडणूक जिंकणे या एकमेव उद्दिष्टाने विजय मेळावे, न्याय यात्रा, संकल्प यात्रा, रोड शो, मतदारांशी संवाद साधण्यासाठी छोटेखानी सभा-बैठका असा धुमधडाका लावून उमेदवार त्यांची प्रतिमा मतदारांच्या मनपटलावर कोरण्याचा प्रयत्न करीत राहतात. गेल्या काही दिवसांपासून जनता हे सारे अनुभवत आहे. निवडणुकीपूर्वीचा हा माहोल त्यांच्या अंगवळणी पडला आहे, असे म्हटले तरी वावगे ठरू नये. एकीकडे घराबाहेर हा घटनाक्रम सुरू असताना, चार भिंतींच्या आत माध्यमांद्वारे भिन्न मतप्रवाह तयार होऊ लागले आहेत. राजकारणात प्रचार, आरोप-प्रत्यारोप, आश्वासने, ती पूर्ण न झाल्यामुळे होणारी टीका, उमेदवारांचे चारित्र्यहनन वगैरे मुद्द्यांनी भारून जात असतो. एकीकडे दररोज कानांवर आदळणार्‍या या गोष्टींवर चर्चा करताना, मतदार स्वतःपुरते काही ‘फिल्टर’ करीत असतात. म्हणजे उमेदवार कार्यक्षम आहे आणि म्हणून गुन्हेगारी प्रवृत्तीचा असला तरी चालेल किंवा उमेदवार आदर्श वाटतो; पण पैसे वाटू शकत नाही, या कारणास्तव त्याच्यावर अन्याय करण्याचा चुकीचा निर्णय मतदानाच्या दिवसापर्यंत तयार होत असतो.

मतदारांच्या हाती दर पाच वर्षांनी चाणक्य होण्याची संधी येत असते. भले त्यांचे निर्णय चुकत असले तरी तो घेण्याच्या स्थितीपर्यंत करावा लागणारा गृहपाठ त्यांच्यापरीने ते करीत असतात. मतदाराला ‘माईंड गेम’ खेळण्याची संधी असते आणि त्यामध्ये त्याच्या मनातले कोणालाही कळू नये, याची तो व्यवस्थित काळजी घेत असतो. राजकारणावर सुरू असलेल्या चर्चा त्याअर्थी वायफळ नसतात, तर उलटपक्षी चुकीच्या अथवा बरोबर निर्णयापर्यंत येण्यासाठी फलदायी ठरत असतात! प्रस्थापित सरकारच्या विरुद्ध त्यांनी केलेल्या चुकांमुळे ‘अ‍ॅन्टी इन्कम्बन्सी’चे वातावरण तयार होत असते. ते आहे की नाही, हे कळायला तसा मार्ग नसतो; परंतु ते नाही हे ठामपणे सांगण्याची सत्तारूढ पक्षाला गरज असते. भाजपने ‘अ‍ॅन्टी-इन्कम्बन्सी’ची लाट निर्माणच होणार नाही, याची खबरदारी घेतली आहे.

मतदारांना त्यांचा ‘आतला’ आवाज ऐकू जाणार नाही याची तजवीजही होऊ शकते. या गोंगाटात मतदार त्यांच्या अंतर्मनाला भावणारा निर्णय घेतीलच असे नाही. सामूहिक भावनांचा कल्लोळ मनात शिरणार नाही याची काळजी घेतली, तर मतदाराला किमान मत वाया गेले नाही, याचे तरी समाधान लाभेल. उमेदवार निवडून आला की, मत वाया गेले नाही, असा गोड गैरसमज परिपक्व म्हणवणारे मतदारही करून घेत असतात. निवडून आलेला उमेदवार आपल्याला पाच वर्षे न्याय देईल काय, याची खातरजमा करायला हवी. आपण आपला विश्वास त्याच्याकडे ‘ठेव’त असतो. ती ठेव कोणत्याही परिस्थितीत सुरक्षित राहायला हवी. व्याज मिळाले तर उत्तम. अशा उमेदवारात पुन्हा विश्वासाची गुंतवणूक करायला हरकत नाही.

मतदारांनी त्यासाठी एक आचारसंहिता बनवायला हवी आणि कटाक्षाने पाळायला हवी. विचारपूर्वक मतदान करेन, भूलथापांना बळी पडणार नाही, मोहाचे क्षण अव्हेरेल आणि तरच लोकशाहीचे गांभीर्य जपणार्‍या उमेदवाराच्या नावासमोरची तो कळ दाबेल. या आचारसंहितेत व्यक्तिगत विकास आणि देशाचे व्यापक हित, दोन्ही कसे सांभाळले जाईल, याची खबरदारी घेतली जाऊ शकेल. निवडणुकीच्या रणधुमाळीत एक गमतीदार बातमी वाचनात आली. माणसाचे शेपूट गायब होऊन म्हणे अडीच लाख वर्षे उलटली आहेत. वैज्ञानिकांनी उंदरावर प्रयोग करुन हा निष्कर्ष काढला आहे. माणसाचा मेंदू भलताच विकसित झाला आहे; पण त्याने तो वापरण्याचे बंद केले, असा निष्कर्ष निघू नये यासाठी मतदारांनी ‘डोके’ लावूनच मतदान करायला हवे.

Back to top button