मंगळावर जाण्यासाठी चंद्रावर बनणार मानवी तळ | पुढारी

मंगळावर जाण्यासाठी चंद्रावर बनणार मानवी तळ

वॉशिंग्टन : पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह म्हणजेच चंद्र नेहमीच मानवाला खुणावत राहिलेला आहे. मानवाचे चंद्रावर पहिले पाऊल पडण्याच्या घटनेला आता अर्धशतक उलटून गेले आहे. आता चंद्रावर मानवी वसाहत स्थापन करण्याची स्वप्ने मनुष्य प्रजाती पाहू लागली आहे. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने यासाठीची जय्यत तयारीही सुरू केली आहे. अर्थात ही मानवी वसाहत म्हणजे दीर्घपल्ल्याच्या अंतराळ मोहिमांसाठीचा एक ‘थांबा’ असेल. याचा अर्थ चंद्रावर एक मानवी तळ निर्माण केला जाईल व तेथून मंगळासारख्या ग्रहांकडे अंतराळयान पाठवले जाईल. ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ डॉ. मॅगी एडरिन-पोकॉक यांनी चंद्रावर एक तळ बनवण्याच्या योजनेबाबत तसेच ‘नासा’ची भविष्यातील मानवयुक्त ‘आर्टेमिस’ मोहीम याबाबतही आता सविस्तर माहिती दिली आहे.

आपल्या सौरमंडळात पृथ्वीच्या सर्वात जवळ असलेला खगोल अर्थातच चंद्र आहे. सौरमंडळाच्या अन्य खगोलावर जाण्यासाठी बरेच दीर्घ अंतर कापावे लागणार आहे. त्यामुळे थेट पृथ्वीवरूनच अशा दीर्घ प्रवासाला सुरुवात करण्याऐवजी चंद्रावरून केली तर ती अधिक सोयीची ठरू शकते. त्यामुळेच चंद्राविषयी ‘नासा’ला आता पुन्हा एकदा रस वाटू लागला आहे. ‘अपोलो’ मोहिमांमध्ये अमेरिकेचे अंतराळवीर चंद्रावर जाऊन आले होते.

आता 50 वर्षांनंतर ‘आर्टेमिस’ मोहिमेतून पुन्हा एकदा अंतराळवीर चंद्रावर जातील. डॉ. मॅगी एडरिन पोकॉक यांनी ‘यूएनआयएलडी’शी बातचीत करीत असताना सांगितले की, ‘नासा’ची आर्टेमिस मोहीम मानवाला चंद्रावर पाठवत आहे. पण तिचा मुख्य उद्देश चंद्राला एक स्टेजिंग पोस्टच्या रूपात वापरण्याचा आहे. ‘नासा’नेही म्हटले आहे की, माणूस पृथ्वीबाहेर कसा राहू शकतो, हे पडताळून पाहण्यासाठीची ही मोहीम आहे. एंडरिन यांनी सांगितले की, चंद्रावर गुरुत्वाकर्षण कमी असल्याने तेथून अंतराळयान लाँच करणे सोपे ठरते. तेथून मंगळासारख्या अन्य ग्रहांवर जाणे माणसाला सोपे ठरू शकते. भविष्यात म्हणजेच आगामी तीस, चाळीस किंवा 50 वर्षांमध्ये चंद्रावर मानवी तळ असेल व तेथून अंतराळयान लाँच केले जाईल.

Back to top button