Robot : आता शेतातही कष्ट घेणार रोबो! | पुढारी

Robot : आता शेतातही कष्ट घेणार रोबो!

वॉशिंग्टन : तंत्रज्ञानातील नवनवे शोध मनुष्य जातीचे काम बरेच सोपे करत आहेत, हे सर्वश्रुत आहे. आजकाल प्रत्येक क्षेत्रातच असे नवे आणि अनोखे तंत्रज्ञान दिसून येते. असेच एक खास तंत्रज्ञान म्हणजे रोबो. सध्याचा जमाना एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचा असून, बर्‍याच ठिकाणी रोबो माणसांना बदलत त्यांची कामे करताना दिसून येत आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला असून, यात रोबो चक्क शेतात काम करताना दिसून येतो आहे.

या व्हिडीओत सदर रोबो अतिशय वेगाने शेतातील पीक कापत असल्याचे दिसून येते. माणसाचे शेतातील काम किती सोपे होईल, याचीच या व्हिडीओवरून प्रचिती येते आहे. मात्र, अनेकांनी हा व्हिडीओ एआयच्या मदतीने तयार केला गेला असल्याचा दावा केला आहे.

फार्मिंग डाटाबेस या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर झाला आहे आणि साहजिकच शेतात एखादा रोबो कष्ट करत असल्याचे पाहत त्यावर प्रतिक्रियांची बरसात देखील झाली आहे. काहींना हे तंत्रज्ञान अतिशय उपयुक्त वाटतं, तर काहींनी ही प्रोसेस बर्‍याच घटकांसाठी, विशेष करून शेतमजुरांसाठी धोकादायक ठरू शकते, अशी भीती व्यक्त केली आहे.

प्रत्यक्षात रोबो खरोखरच शेतात काम करताना, असे दिसून येणार का, असा प्रश्न विचारला तर नजीकच्या भविष्यात अशी कोणतीही शक्यता दिसून येत नाही. मात्र, ज्या ठिकाणी खरोखरच मजुरांची कमतरता जाणवते, तेथे असे तंत्रज्ञान उपलब्ध झाल्यास ते वरदान ठरू शकते, असा अभ्यासकांचा दावा आहे.

Back to top button