एकाच ठिकाणी राहतात 11 देशांचे मासे एकत्र! | पुढारी

एकाच ठिकाणी राहतात 11 देशांचे मासे एकत्र!

जयपूर : आपण मत्स्यप्रेमी अर्थात फक्त मासे न्याहाळण्याचे छंदिष्ट असाल तर उदयपूरचे ‘अंडर द सन’ हे फिश अ‍ॅक्वेरियम अतिशय उत्तम आकर्षण केंद्र ठरू शकेल. मुळातच राजस्थानच्या उदयपूर शहराला वैभवशाली नैसर्गिक सौंदर्य लाभले आहे. तेथील पर्यटन स्थळे जगभरातून वाखाणली गेली आहेत. याच शहरातील हे फिश अ‍ॅक्वेरिम अतिशय अल्पावधीत नावारूपास आले आहे आणि याचे अनोखे कारण असे की, या मत्स्यालयात अगदी 11 देशांचे मासे एकाच ठिकाणी अतिशय गुण्यागोविंदाने राहतात!

या अनोख्या फिश टँकमध्ये तब्बल 11 देशांमधले जवळपास दीडशेहून अधिक प्रजातींचे मासे आहेत. आणखी आश्चर्याची बाब म्हणजे पर्यटक केवळ हे मासे पाहूच शकत नाहीत, तर त्यांना स्पर्शही करू शकतात. जमिनीखाली वसलेले हे मत्स्यालय पाहून पर्यटक अक्षरश: हैराण होतात. फतह सागर तलावाकिनारी हे फिश अ‍ॅक्वेरियम आहे. इथे रंगीबेरंगी हजारो मासे एकत्र पाहायला मिळतात. ज्यामुळे पर्यटक या अ‍ॅक्वेरियमकडे पुन्हा पुन्हा आकर्षित होतात.

इथे केवळ समुद्रतळाशी राहणारे मासे असतात आणि त्यांची विशेष काळजी घेतली जाते. जमिनीखाली असलेल्या या अ‍ॅक्वेरियमध्ये गेल्यानंतर वेगळाच फिल येतो आणि आपण जमिनीच्या खाली आहोत, असाच भास होतो. या ठिकाणची नजाकत वाढवण्यासाठी येथे थ्रीडी गॅलरीदेखील बनवण्यात आली आहे. वर्षभर हे अ‍ॅक्वेरियम सकाळी 8 पासून रात्री 11 पर्यंत खुले असते.

Back to top button