सौरमालिकेजवळ असू शकतात पाच ‘मुक्त’ ग्रह | पुढारी

सौरमालिकेजवळ असू शकतात पाच 'मुक्त' ग्रह

न्यूयॉर्क ः आपल्या सौरमालिकेत केवळ चार ग्रह असे आहेत ज्यांचा पृष्ठभाग कठीण, खडकाळ आहे. मात्र, आपल्या सौरमालिकेच्या बाहेर, जवळच असे किमान पाच ग्रह असू शकतात, जे अंतराळात मुक्तपणे तरंगत आहेत. अर्थात ते कोणत्याही तार्‍याला बांधलेले नाहीत.

अशा ग्रहांना ‘फ्री-फ्लोटिंग प्लॅनेटस्’ (एफएफपी) असे म्हटले जाते. हे एखाद्या ग्रहाच्या आकाराचे असे खगोल असतात जे कोणत्याही तार्‍याभोवती फिरत नाहीत. त्यांना ‘रग प्लॅनेटस्’ असेही म्हटले जाते. ते कदाचित एखाद्या तार्‍याभोवतीच्या स्वतःच्या कक्षेतून बाहेर पडलेले ग्रहही असू शकतात. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने आपल्या ‘मिल्की वे’ नावाच्या आकाशगंगेत व त्यापलीकडेही असे शेकडो ‘एफएफपी’ शोधलेले आहेत. त्यामध्येच ओरियन तारकापुंजातील गुरूच्या आकाराच्या दोन ग्रहांच्या जोडीचाही समावेश आहे. बहुतांश ‘एफएफपी’ हे मंगळ ग्रहाच्या आकाराइतके असतात. काही रग प्लॅनेटस् हे त्यांच्या तार्‍याने बाहेर फेकलेले असतात.

‘अ‍ॅस्ट्रोनॉमिकल जर्नल लेटर्स’ या नियतकालिकात आता याबाबतचे एक नवे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, आपल्या सूर्यानेही बाहेर फेकलेले, असे काही ग्रह सौरमालिकेच्या जवळ असू शकतात. त्यामध्ये खडकाळ पृष्ठभागाच्या ग्रहांचाही समावेश असू शकतो. प्रिन्सटन युनिव्हर्सिटीच्या आमीर सिराज यांनी याबाबतचे संशोधन केले आहे.

Back to top button