केरळ मधील १०४ वर्षे वयाच्या आजीबाईंचे परीक्षेत यश | पुढारी

केरळ मधील १०४ वर्षे वयाच्या आजीबाईंचे परीक्षेत यश

तिरुवनंतपूरम : केरळमधील साक्षरता दर देशात सर्वात अधिक आहे. अगदी उतारवयातही लोकही तिथे साक्षरतेचे धडे घेत असतात व त्यासाठी या राज्यात सातत्याने जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात. आता केरळ साक्षरता परीक्षेत तब्बल 104 वर्षे वयाच्या आजीबाईंनी मोठे यश मिळवले आहे. कुट्टियाम्मा नावाच्या या आजीबाईंनी परीक्षेत शंभरपैकी 89 गुण मिळवले.

अनेक लोक वयाची चाळीशी गाठली तरी शारीरिक व मानसिकद़ृष्ट्या थकतात आणि नवी उमेद गमावून बसतात. अशावेळी वयाची शंभरी ओलांडलेल्या या आजीबाईंचा शिकण्याचा उत्साह प्रेरणादायी आहे. त्यांनी अथक मेहनत घेऊन केरळ राज्याच्या साक्षरता मोहिमेतील परीक्षेत चांगली कामगिरी करून दाखवली.

कुट्टियाम्मा यांना लहानपणी शाळेत जाऊन शिकण्याची संधी मिळाली नव्हती. तसेच त्यांना लिहिता-वाचताही येत नव्हते. मात्र, साक्षरता मोहिमेमुळे त्यांना शिकण्याची संधी मिळाली. त्या रोज आपल्या घरीच सकाळ-संध्याकाळच्या वर्गात न चुकता शिक्षकांसमोर उपस्थित राहत असत.

वयोमानामुळे शरीर थकले आहे आणि त्यांना ऐकूही कमी येते. मात्र, या सर्व गोष्टींवर मात करून त्यांनी जिद्दीने साक्षरतेचे धडे घेतले व परीक्षेतही चांगले गुण मिळवून दाखवले. केरळचे शिक्षणमंत्री वासुदेवन शिवनकुट्टी यांनी त्यांचे छायाचित्र सोशल मीडियात शेअर करून त्यांचे अभिनंदन केले आहे. ज्ञानाच्या दुनियेत प्रवेश करण्यासाठी वयाचे बंधन नसते. अत्यंत सन्मान व प्रेमाने मी कुट्टियाम्मा व अन्य सर्व नव्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो, असे त्यांनी म्हटले आहे.

Back to top button