‘या’ ग्रहांवर होतो हिर्‍यांचा वर्षाव! | पुढारी

‘या’ ग्रहांवर होतो हिर्‍यांचा वर्षाव!

वॉशिंग्टन : पृथ्वीच्या पोटात लाखो वर्षांपासूनचा दाब व उच्च तापमान यामुळे हिर्‍यांची निर्मिती होत असते. मात्र आपल्याच ग्रहमालिकेत काही असेही ग्रह आहेत जिथं असलेल्या विशिष्ट वातावरणामुळे तिथे चक्क हिर्‍यांचा पाऊसच पडतो. हे ग्रह म्हणजे नेपच्यून आणि युरेनस.
नेपच्यून हा ग्रह पृथ्वीपेक्षा 15 पट अधिक मोठा असून युरेनस पृथ्वीपेक्षा सतरा पट मोठा आहे. या दोन्ही ग्रहांवर असे वातावरण आहे ज्यामुळे हिर्‍यांची निर्मिती होत असते.

युरेनस आणि नेपच्यूनवर मोठ्या प्रमाणात मिथेन वायू आहे. मिथेनमध्ये हायड्रोजन आणि कार्बन असतात. त्यांचे रासायनिक सूत्र ‘सीएच4’ असे आहे. ज्यावेळी नेपच्यून आणि युरेनसवर मिथेचा दाब वाढतो त्यावेळी हायड्रोन आणि कार्बनचे बंध तुटतात. त्यामुळे कार्बन हिर्‍यामध्ये परिवर्तित होतो. अशा हिर्‍यांचा तिथे अक्षरशः पाऊस पडतो.

या ग्रहांवर मिथेन वायू बर्फासारखा गोठलेला असतो आणि ज्यावेळी वारा सुटतो त्यावेळी तो ढगांसारखा उडत राहतो. तेथील पृष्ठक पूर्णपणे समतल असल्याने वारेही ‘सुपरसोनिक’ गतीने वाहतात. त्यांचा वेग ताशी 1500 मैल इतका असतो. तेथील वातावरणात संघनित कार्बन असल्याने तिथे हिर्‍यांचा पाऊस पडतो. तेथील तापमान शून्यापासून खाली 200 अंश सेल्सिअसपर्यंत घसरते. त्यामुळे तिथे जीवसृष्टीची शक्यता नाही.

Back to top button