‘ते’ पायाचे ठसे खरोखरच 23 हजार वर्षांपूर्वीचे! | पुढारी

‘ते’ पायाचे ठसे खरोखरच 23 हजार वर्षांपूर्वीचे!

वॉशिंग्टन : उत्तर अमेरिकेत जगातील सर्वात जुन्या मानवी पाऊलखुणा आढळून आल्या होत्या. न्यू मेक्सिकोमधील व्हाईट सँडस् नॅशनल पार्कमध्ये प्रागैतिहासिक काळातील मानवांच्या पावलांचे ठसे आढळले होते. ते नेमके किती जुने आहेत याबाबत नवे संशोधन करण्यात आले असून त्यानुसार या पाऊलखुणा खरोखरच 23 हजार ते 21 हजार वर्षांपूर्वीच्या काळातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या जगातील सर्वात प्राचीन मानवी पाऊलखुणा ठरल्या आहेत. मात्र, या संशोधनानंतरही काही संशोधक निष्कर्षांशी सहमत नाहीत.

या संशोधनासाठी काळ ठरवणार्‍या दोन तंत्रांचा वापर करण्यात आला. यापूर्वी याबाबतच्या संशोधनाची माहिती 2021 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, त्यामधील निष्कर्षांनाही काही संशोधकांनी विरोध दर्शवला होता. त्यांच्या अक्षेपांना उत्तर देण्यासाठी हे नवे संशोधन करण्यात आले. आता जुन्या संशोधनानुसार व नव्या दोन तंत्रांनुसार केलेल्या अध्ययनातूनही या पाऊलखुणा 23 हजार वर्षांपूर्वीच्याच असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

शेवटच्या हिमयुगातील सर्वाधिक थंडीच्या काळातील त्या आहेत. या काळाला ‘ग्लेशियल मॅक्झिमम’ असे म्हटले जाते. 26,500 ते 19 हजार वर्षांपूर्वीचा हा काळ आहे. यापूर्वी असे मानले जात होते की 13 हजार वर्षांपूर्वी क्लोव्हिस लोक उत्तर अमेरिकेत प्रथम आले. मात्र, त्यांच्याही पूर्वी उत्तर अमेरिकेत माणसे राहत होती याचे वेळोवेळी काही पुरावे मिळत गेले. या पाऊलखुणा त्याचा सज्जड पुरावा ठरला आहे. डेनवरमधील जियोसायन्स अँड एन्व्हायर्न्मेंट चेंज सायन्स सेंटरमधील जियॉलॉजिस्ट जेफरी पिगाटी व कॅथलिन स्प्रिंगर यांनी याबाबतचे संशोधन केले.

Back to top button