थायलंडमध्ये गवतासारखा दिसणारा साप! | पुढारी

थायलंडमध्ये गवतासारखा दिसणारा साप!

बँकॉक : थायलंडमध्ये एक विचित्र दिसणारा जीव आढळून आला आहे. हा प्राणी सापासारखा चालतो; पण त्याच्या अंगावर गवतासारखे दिसणारे हिरवे केस आहेत. हा एक पाणसर्प असावा असे अनेकांना वाटते. त्याचा एक व्हिडीओ एक्स प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे.

या पृथ्वीतलावर अनेक अनोखे प्राणी आहेत. त्यापैकी अनेकांनी आपल्याला माहितीही नसते. त्यामुळे असा विचित्र जीव पाहिल्यावर अनेक लोकांनी आश्चर्य व्यक्त केले. अर्थातच हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला. 69 लाखांपेक्षाही अधिक लोकांनी तो पाहिला असून त्यावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की हा विचित्र प्राणी 60 सेंटीमीटर लांबीचा आहे. एका स्थानिक नागरिकाला तो सापडला आणि त्याने त्याला घरी नेऊन मासे खाऊ घातले.

त्याने या सापाला पाण्याने भरलेल्या भांड्यात ठेवले होते व त्याचा व्हिडीओ सोशल मीडियात शेअर केला आहे. पाण्यात हा प्राणी अगदी सापासारखेच चालतो व त्याच्या तोंडातून सापाप्रमाणेच जीभ बाहेर वळवळते. मात्र, त्याच्या अंगावरील गवतासारखे केस थक्क करणारे आहेत. आता या माणसाने हा प्राणी संशोधकांना सोपवण्याची तयारी केली आहे जेणेकरून हा प्राणी नेमका कोणता आहे हे समजू शकेल. तो ‘पफ-फेस्ड वॉटर स्नेक’ असावा असे काहींना वाटते.

संबंधित बातम्या
Back to top button