विमानावर कोंबड्या फेकून केली जात असे चाचणी! | पुढारी

विमानावर कोंबड्या फेकून केली जात असे चाचणी!

नवी दिल्ली : काही गोष्टी अशा असतात ज्या ऐकल्यावर आपल्याला आश्चर्य वाटू शकते. विमानाच्या इंजिनवर चक्क कोंबड्या फेकून त्यांच्या सुरक्षेची चाचणी घेतली जात होती व काही प्रमाणात सध्याही अशी चाचणी घेतली जाते, हे तुम्हाला माहिती आहे का? यामागेही एक खास कारण आहे व अर्थातच ते विमानाच्या सुरक्षेबाबत आहे.

विमानाच्या इंजिनवर मेलेल्या कोंबड्या किंवा नकली पक्षी फेकून अशा चाचण्या घेतल्या जात होत्या. एखादा पक्षी विमानाच्या फ्लाय विंग्सला धडकला, अशा स्वरूपाचे वृत्त आपण वाचत असतो. यामुळे मोठी दुर्घटनाही होण्याचा धोका असतो. फ्लाईट क्रॅश होऊन शेकडो प्रवाशांचा जीवही जाऊ शकतो. हे टाळण्यासाठीच इंजिन टेस्ट केली जाते. एव्हिएशन एक्सपर्टनुसार जेव्हा विमान आकाशात उड्डाण करीत असते, त्यावेळी या गोष्टीची नेहमीच भीती असते की एखादा पक्षी येऊन विमानाला धडकेल. त्यामुळे विमान निर्माण करणार्‍या कंपन्या कोंबड्या इंजिनवर फेकून चाचणी घेतात. त्याला ‘बर्ड कॅनन’ असे म्हटले जाते.

अनेक वेळा त्यासाठी नकली पक्षीही वापरले जातात किंवा मेलेल्या कोंबड्या. त्यासाठी दोन ते चार किलो चिकनचा वापर होतो. अनेक वर्षांपासून असे केले जात होते. सर्वात आधी 1950 मध्ये हार्टफोर्डशायरच्या डे हेवीलँड एअरक्राफ्टमध्ये असा प्रकार करण्यात आला होता. या कामात मेलल्या कोंबड्यांचा वापर करून हे पाहिले जाते की धडकेमुळे इंजिनला आग तर लागत नाहीये ना! सध्या असे अतिशय कमी केले जाते किंवा अजिबातच केले जात नाही. याचे कारण म्हणजे इंजिन चाचणी करण्याच्या इतरही आधुनिक पद्धती समोर आल्या आहेत.

Back to top button