मेंदू खाणारी बुरशी जमिनीपासून समुद्रात | पुढारी

मेंदू खाणारी बुरशी जमिनीपासून समुद्रात

सॅक्रामेंटो : मानवी मेंदू ला अत्यंत वाईट पद्धतीने प्रभावित करणारा एक फंगस (बुरशी) जमिनीपासून समुद्रात पोहोचला आहे. या बुरशीमुळे आतापर्यंत 40 डॉल्फिन व पॉरपॉएजचा मृत्यू झाला आहे.

आता ही बुरशी पॅसिफिक महासागराच्या पश्चिमोत्तर भागात मोठ्या वेगाने पसरू लागली आहे. 1997 ते 2016 या कालावधीत शास्त्रज्ञांना 42 असे मृत डॉल्फिन आढळून आले की, ते बुरशीने मरण पावले होते.

वॉशिंग्टन व ब्रिटिश कोलंबियाच्या आसपास असलेल्या सॅलिस समुद्रात मृत झालेले 42 डॉल्फिन्स आढळून आले होते. या डॉल्फिनच्या शरीरात अशी बुरशी आढळून आली की, ती जमीन अथवा झाडांवर आढळून येते. या बुरशीचे नाव ‘क्रिप्टोकोकस गट्टी’ असे आहे.

क्रिप्टोकोकस गट्टी नामक ही बुरशी उष्णकटिबंधीय आहे. याच बुरशीने डॉल्फिन्स माशांचा मेंदू व फुफ्फुस यांना अत्यंत वाईट पद्धतीने प्रभावित केले होते. या बुरशीमुळे निर्णय घेण्याची मेंदू ची क्षमता संपुष्टात येते. त्यानंतर ही बुरशी संपूर्ण मेंदूलाच खाऊन टाकते.

क्रिप्टोकोकस गट्टी बुरशीमुळे ब्रिटिश कोलंबियात 1999 ते 2007 दरम्यान 218 लोक आजारी पडले. तर 19 जणांचा मृत्यू झाला. ‘डिसिजेस ऑफ अ‍ॅक्वेटिक ऑर्गेनिझम’ नामक जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनातील माहितीनुसार वातावरणातील बदलामुळे या बुरशीचे ठिकाण बदलू लागले आहे.

Back to top button