चक्क गुलाबी अननस! | पुढारी

चक्क गुलाबी अननस!

लंडन : सध्या जनुकीय बदल किंवा फेररचना करून अनेक भाज्या व फळांचीही निर्मिती केली जात आहे. आता संशोधकांनी असाच प्रकार करून चक्क गुलाबी रंगाचे अननस विकसित केले आहे. बाहेरून ते सर्वसामान्य अननससारखेच दिसते; पण आतून त्याचा रंग असा गुलाबी आहे. कोस्टारिकामध्ये या अननसचे उत्पादन घेण्यात आले. ही प्रजाती विकसित करण्यासाठी सोळा वर्षे लागली. त्याचे पेटंटही करण्यात आले असून ‘डेल मोंटे’ या कंपनीकडून ते विकण्यात आले.

या अननसला असा गुलाबी रंग कसा मिळाला याचे अनेकांना कुतुहल वाटले. त्याच्या गराला हा गुलाबी रंग येण्यामागे ‘लिकोपिन’ची अतिरिक्त मदत झाली आहे. हे एक ‘कॅरोटेनॉईड’ आणि पिग्मेंट असून ते अननसात नैसर्गिकरीत्याच आढळते. याच संयुगामुळे कलिंगड आणि टोमॅटोंना लाल रंग मिळतो.

अननसात लिकोपिन हे सहसा एन्झाईममुळे बिटा-कॅरोटिनमध्ये रूपांतरीत होते. त्यामुळे अननसाच्या गराला पिवळसर रंग मिळतो. लिकोपिन बिटा-सायक्लेस एन्झाईममुळेच आता हा गुलाबी रंगही आला आहे. डेल माँटे या कंपनीकडेच या अननसाच्या उत्पादनाचे हक्क आहेत. पेटंटमधील माहितीनुसार ‘आरएनए इंटरफेरनस’ या तंत्राद्वारे हे लिकोपिन-कन्व्हर्टिंग एन्झाईममध्ये बदल घडवण्यात आले.

Back to top button