आई-बाबा आणि जुळ्यांचा वाढदिवस एकाच दिवशी! | पुढारी

आई-बाबा आणि जुळ्यांचा वाढदिवस एकाच दिवशी!

वॉशिंग्टन : जन्म कधी होईल व मृत्यू कधी येईल हे माणसाला सांगता येत नाही. त्यामधूनही अनेक थक्क करणारे योगायोग समोर येत असतात. आता अमेरिकेतील एका जोडप्याला त्यांच्याच वाढदिवशी एक अनोखी ‘गिफ्ट’ मिळाली. त्यांच्या जुळ्यांचा जन्मही त्यांच्या वाढदिवसाच्या तारखेलाच झाला. अशा प्रकारे आई-बाबा आणि या जुळ्यांचा असे संपूर्ण कुटुंबाचा वाढदिवस एकाच दिवशी आला!

31 वर्षीय सायरा ब्लेअर आणि 32 वर्षीय जोस एर्विन या दोघांच्याही वाढदिवसाची तारीख 18 ऑगस्ट असते. गेल्या महिन्यात याच दिवशी त्यांच्या जुळ्या अपत्यांचा जन्म झाला. त्यामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी आहे. क्लीव्हलँड क्लिनिक हिलक्रेस्ट रुग्णालयाने यासंदर्भातील माहिती आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

त्यांनी फोटो शेअर करीत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की ‘काहीही शक्य आहे! आई-वडील आणि त्यांच्या नवजात मुलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! त्यांच्या गोड, सुद़ृढ बाळांसाठी अभिनंदन!’ या कुटुंबाचे छायाचित्र पाहून अनेक लोकांनी आनंद व्यक्त केला आणि त्यांना शुभेच्छाही दिल्या. एकाच दिवशी सर्व कुटुंबाचा वाढदिवस आल्याने या योगायोगाबाबतही अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.

Back to top button