चांद्रयान 3, लुना 25, आर्टेमिस… सार्‍यांचे मिशन एकच! | पुढारी

चांद्रयान 3, लुना 25, आर्टेमिस... सार्‍यांचे मिशन एकच!

वॉशिंग्टन : नील आर्मस्ट्राँग हा चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला अंतराळवीर. आताही याच चंद्राचे आपल्याला वेध असतात. अमेरिका, चीन, रशियासह अनेक महाशक्ती राष्ट्रे सध्या एकाच मोहिमेवर सर्वाधिक लक्ष केंद्रित करून आहेत आणि ती म्हणजे अशीच चांद्रमोहीम! भारताने ‘चांद्रयान 3’ लँडर पाठवला आहे, तर रशियानेदेखील ‘लुना 25’ मिशन लाँच केली आहे. हे दोन्ही मिशन चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहेत. याशिवाय, ‘आर्टेमिस प्रोग्राम’च्या माध्यमातून पुन्हा एकदा चंद्रावर माणूस पाठवण्यासाठी अमेरिका महत्त्वाकांक्षी आहे. चंद्रावर जाऊन मायनिंगची कितपत शक्यता आहे, याचा कानोसा घेण्याचा अमेरिकेचा प्रयत्न असणार आहे. याचमुळे चंद्रावर संशोधनासाठी इतकी सारे राष्ट्रे का महत्त्वाकांक्षी आहेत, असा प्रश्न निर्माण होतो आणि त्याचे उत्तर चंद्रावर दडलेल्या खनिजात आहे.

वर्तमानात असे मानले जाते की, कोट्यवधी वर्षांपूर्वी एक विशाल पिंड आपल्या पृथ्वीशी थडकला होता. त्याच्या अवशेषातून चंद्रनिर्मिती झाली. चंद्रावरील एक दिवस पृथ्वीवरील 14 दिवसांसमान असतो. ज्यावेळी चंद्रावर दिवस असतो, त्यावेळी तेथील तापमान 127 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचते. याचवेळी पूर्ण सावलीत हेच तापमान उणे 173 डिग्रीपर्यंत असते. चंद्रावर पाणी असून त्यातील डायड्रोक्सिल अणुंबाबत भारताच्या चांद्रयानाने 2008 मध्ये शोध लावला होता.

पाणी जीवनासाठी अतिशय महत्त्वाचा घटक आहे. याशिवाय, स्पेस एजन्सींना अंतराळात प्रदीर्घ यात्रेचे नियोजन करायचे आहे. पाण्यातून हायड्रोजन व ऑक्सिजन वेगळे करून रॉकेट इंधनही तयार केले जाऊ शकते. मंगळावर मनुष्य पाठवण्यामागे जी मोहीम आहे, त्यानुसार चंद्रावर लाँच पॅड असणार आहे. पृथ्वीवरून रॉकेट प्रथम चंद्रावर जातील, तेथे इंधन भरले जाईल आणि ते मंगळाच्या दिशेने रवाना होतील. याशिवाय, हिलियम-3 चंद्रावर आहे, जे पृथ्वीवर दुर्मीळ आहे.

30 लाख टन हिलियम-3 तर चंद्रावरच अस्तित्वात आहे, असा ‘नासा’चा दावा आहे. युरोपियन स्पेस एजन्सींच्या मतानुसार, हिलियम-3 चा वापर अणू ऊर्जेत केला जाऊ शकतो. मात्र, त्याची खासियत अशी आहे की, ते रेडियोअ‍ॅक्टिव्ह असत नाही. याशिवाय स्मार्टफोन, कॉम्प्युटर, अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजीशी संलग्न खनिज चंद्रावर अस्तित्वात आहेत. पण, चंद्रावर उत्खनन कसे करणार? याची कोणतीही माहिती यापैकी एकाही घटकाकडे नाही, ही वस्तुस्थिती आहे.

Back to top button