एकेकाळी खरोखरच हिरवेगार होते ग्रीनलँड! | पुढारी

एकेकाळी खरोखरच हिरवेगार होते ग्रीनलँड!

बर्लिंग्टन : ‘ग्रीनलँड’च्या नावात ‘ग्रीन’ म्हणजेच ‘हिरवा’ हा शब्द असला तरी सध्या हा देश पांढर्‍याशुभ्र बर्फाच्या चादरीने आच्छादलेला आहे. मात्र, एकेकाळी म्हणजेच सुमारे 4 लाख वर्षांपूर्वी ग्रीनलँडचा मोठा भाग बर्फमुक्त होता. या बेटाच्या वायव्येकडील उंच भाग भरपूर सूर्यप्रकाशाने उजळून जात असे. तेथील सुपीक माती आणि अनेक प्रकारची हिरवीगार झाडे होती. स्प्रूसच्या झाडांचे जंगल ग्रीनलँडच्या दक्षिण भागात पसरलेले होते. ग्रीनलँडमधील मातीच्या नमुन्यांचेही संशोधकांनी अध्ययन केले असून ते त्यांना भविष्याबाबत चिंतित करणारेच आहे.

चार लाख वर्षांपूर्वी वैश्विक समुद्राचा स्तर अत्याधिक म्हणजेच सध्याच्या स्तरापेक्षा 20 ते 40 फूट वर होता. जगभरात सध्या कोट्यवधी लोकांना आश्रय देणारी भूमी त्या काळात पाण्याखाली बुडालेली होती. ग्रीनलँडमधील बर्फाची चादर गेल्या दहा लाख वर्षांमध्ये कोणत्या ना कोणत्या वेळी गायब झाली होती हे वैज्ञानिक आधीपासूनच जाणतात.

मात्र, ती नेमक्या कोणत्या कालखंडात गायब झाली होती हे निश्चितपणे सांगता येत नाही. ‘सायन्स’ या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की संशोधकांनी ग्रीनलँडमधील बर्फाच्या सुमारे एक मैल जाडीच्या चादरीखाली असलेली माती शीत युद्धाच्या काळात बाहेर काढली होती. त्या मातीचे वयही निर्धारित करण्यात आले होते. सुमारे 4,16,000 वर्षांपूर्वी ज्यावेळी मोठ्या प्रमाणात बर्फ मुक्त स्थिती 14 हजार वर्षे सुरू राहिली त्या काळाचा अभ्यास करण्यासाठी ही माती महत्त्वाची ठरली.

गेल्या 1,25,000 वर्षांच्या काळात पृथ्वीच्या हवामानात कसे नाट्यमय बदल घडत गेले हे त्यावरून शोधण्यात आले. विस्तारित शीत काळात बर्फाची चादर वाढत गेली. तसेच हवामान उष्ण बनल्यावर बर्फ वितळून समुद्राच्या पाण्याच्या स्तरात भीषण वाढ झाली. त्यामुळे जगभरातील किनारपट्टीवर पूराची स्थिती निर्माण झाली. सध्याही ग्रीनहाऊस गॅसेसमुळे पृथ्वीच्या तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे बर्फ वेगाने वितळत असून भविष्यात त्यामुळे समुद्राचा जलस्तर वाढून तटीय शहरांमध्ये पाणी घुसू शकते.

Back to top button