स्लोथच्या हाडापासून बनवलेले 25 हजार वर्षांपूर्वीचे पेंडंट | पुढारी

स्लोथच्या हाडापासून बनवलेले 25 हजार वर्षांपूर्वीचे पेंडंट

वॉशिंग्टन : माणसाला दागदागिन्यांची हौस आदिम काळापासूनच आहे. आता ब्राझीलमध्ये तब्बल 25 हजार वर्षांपूर्वीचे पेंडंट म्हणजेच गळ्यात परिधान करण्याचे पदक सापडले आहे. हे पेंडंट स्लोथ या प्राण्याच्या हाडापासून बनवलेले आहे. यावरून दक्षिण अमेरिकेत मानवाची वसाहत 25 हजार वर्षांपासून असल्याचेही स्पष्ट झाले. या प्राचीन मानवाने हाडामध्ये टोकदार दगडी अवजाराने छिद्र पाडले होते.

मध्य ब्राझीलमधील सांता एलिना रॉक शेल्टरमध्ये तीन जायंट ग्राऊंड स्लोथच्या हाडांचा ढिगारा सापडला. त्याच्या शेजारीच दगडांची अवजारेही सापडली. याच ठिकाणी हे हाडाचे पेंडंटही मिळाले. दगडाच्या हत्याराने हाडाला छिद्र बनलेले असून हे केवळ माणूसच करू शकतो. अमेरिका खंडातील मानवाच्या उपस्थितीचा हा सर्वात प्राचीन पुरावा ठरला आहे.

याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘प्रोसिडिंग्ज ऑफ द रॉयल सोसायटी’ या नियतकालिकात देण्यात आली आहे. सांता एलिना रॉक शेल्टर हे मध्य ब्राझीलच्या माटो ग्रोस्सो राज्यात आहे. याठिकाणी 1985 पासूनच पुरातत्त्व संशोधन सुरू आहे. यापूर्वीच्या संशोधनात तिथे भिंतीवरील एक हजारपेक्षाही अधिक चिन्हे व आकृत्या सापडल्या होत्या. तसेच शेकडो दगडी अवजारे व स्लोथ प्राण्याचे अनेक अवशेषही सापडले होते.

Back to top button