एलन मस्क यांनी सुरू केली नवी ‘एआय’ कंपनी | पुढारी

एलन मस्क यांनी सुरू केली नवी ‘एआय’ कंपनी

वॉशिंग्टन : सध्या ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा बोलबाला असून या क्षेत्रात बड्या कंपन्यांमध्ये स्पर्धाही पाहायला मिळत आहे. ‘ओपन एआय’ने ‘चॅट जीपीटी’ हा चॅटबोट आणल्यावर ‘गुगल’चा बार्ड आणि ‘मायक्रोसॉफ्ट’चा ‘बिंग’ही आला. आता टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ आणि ट्विटरचे मालक एलन मस्क यांनी विश्वाचे वास्तविक स्वरूप समजून घेण्याच्या उद्देशाने एक नवीन ‘एआय’ कंपनी सुरू केली. या कंपनीचे नाव ‘एक्स एआय’ आहे.

मस्क यांनी म्हटले आहे की ‘एआय’ येत्या पाच वर्षांत मानवी बुद्धिमत्तेला मागे टाकेल. ‘एक्स एआय’च्या टीममध्ये असे लोक समाविष्ट आहेत ज्यांनी ‘डीपमाईंड’, ‘ओपन एआय’, ‘गुगल रिसर्च’, ‘मायक्रोसॉफ्ट रिसर्च’ आणि ‘टेस्ला’ येथे काम केले आहे. या टीम सदस्यांनी ‘डीप माईंड’च्या ‘अल्फाकोड’ आणि ‘ओपन एआय’चे ‘जीपीटी-3.5’ आणि ‘जीपीटी-4’ चॅटबॉटस् यासारख्या प्रकल्पांवर काम केले आहे. मस्क या संघाचे नेतृत्व करणार आहेत. नवीन कंपनी मस्कच्या ‘एक्स कॉर्प’पासून वेगळी आहे, परंतु एक्स (ट्विटर), टेस्ला आणि इतर कंपन्यांशी जवळून काम करेल. मस्क हे एआयच्या विकासामध्ये सावधगिरी आणि नियमनाचे समर्थक आहेत.

एआय तंत्रज्ञानाच्या अनियंत्रित प्रगतीमुळे होऊ शकणार्‍या ‘सभ्यता नष्ट’ बद्दल त्यांनी वारंवार चिंता व्यक्त केली आहे. मस्क यांची कंपनी ‘एक्स एआय’मधील ‘एआय’ प्रणालीची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी एक अनोखा द़ृष्टिकोन अवलंबेल. ट्विटर स्पेस इव्हेंटमध्ये, मस्क यांची सुरक्षित एआय तयार करण्याच्या त्यांच्या योजनेची रूपरेषा सांगितली. येत्या पाच-सहा वर्षांत सुपर इंटेलिजन्स येईल, म्हणजेच एआय मानवी बुद्धिमत्तेला मागे टाकेल, असेही एलन मस्क म्हणाले. मस्क म्हणाले, जर ‘एआय’ने विश्वाचे खरे स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर ‘एआय’ सुरक्षिततेच्या द़ृष्टिकोनातून ती खरोखरच सर्वोत्तम गोष्ट असेल.

Back to top button