जगज्जेता अलेक्झांडारनंतर कोण बनले उत्तराधिकारी | पुढारी

जगज्जेता अलेक्झांडारनंतर कोण बनले उत्तराधिकारी

अथेन्स ः इतिहासातील सर्वात यशस्वी योद्धे व शासकांमध्ये मेसिडोनियाच्या अलेक्झांडरचा समावेश होतो. अवघ्या विसाव्या वर्षीच तो मेसिडोनियाच्या सिंहासनावर बसला होता आणि त्यानंतर केवळ बारा वर्षांनी वयाच्या 32 व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला. या काळात त्याने बाल्कन प्रदेशांपासून सध्याच्या पाकिस्तानपर्यंत आपले साम—ाज्य निर्माण केले होते. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा स्पष्ट वारसदार नव्हता. त्यामुळे त्याचा सावत्र भाऊ राजा बनला होता. अलेक्झांडरला ‘अलेक्झांडर चौथा’ आणि त्याच्या प्रेयसीपासून जन्मलेला हेराक्लीज असे दोन मुले होते.

एका रिपोर्टनुसार अलेक्झांडर चौथा हा त्याची पत्नी रोक्साना याचा मुलगा होता. दुसर्‍या मुलाला ‘हेराक्लीज ऑफ मॅसेडोन’ म्हणून ओळखले जाते. तो त्याची प्रेयसी बार्सिनचा मुलगा होता. रोक्साना ही मध्य आशियातील बॅक्ट्रियामधील एका राजाची कन्या होती. सिडनीतील मॅक्वेरी युनिव्हर्सिटीतील प्राचीन इतिहासाचे प्राध्यापक इयान वर्थिंग्टन यांनी आपल्या ‘अलेक्झांडर द ग्रेट ः ए रीडर’ मध्ये म्हटले आहे की बॅक्ट्रियामधील सैन्य मोहिमेवेळी अलेक्झांडरच्या सैनिकांनी रोक्सानाला पकडले होते आणि इसवी सनपूर्व 327 मध्ये अलेक्झांडरने तिच्याशी विवाह केला. तिच्यापासून झालेल्या आपल्या मुलग्याला पाहण्यासाठी अलेक्झांडर जिवंत राहिला नाही. इसवी सनपूर्व 323 मध्ये बॅबिलॉन येथे अलेक्झांडरचा मृत्यू झाला.

त्यावेळी रोक्साना गर्भवती होती. अलेक्झांडरचा दुसरा मुलगा हेराक्लीज हा ‘अलेक्झांडर चौथा’ याच्यापेक्षा चार वर्षांनी मोठा होता व त्याला अलेक्झांडरचा औरस पुत्र मानले जात नाही. त्याचा जन्म इसवी सन पूर्व 327 च्या आसपास बार्सिन नावाच्या महिलेपासून झाला होता. काही आधुनिक इतिहासकार तो अलेक्झांडरचाच मुलगा होता का, याबाबत शंका व्यक्त करतात. याचे कारण म्हणजे अलेक्झांडरने त्याला आपला मुलगा म्हणून औपचारिकरीत्या कधीही स्वीकारले नव्हते. मात्र, काही इतिहासकारांच्या मते, अलेक्झांडरच त्याचा जैविक पिता होता. 32 व्या वर्षी ज्यावेळी अलेक्झांडरचा रहस्यमय आजाराने मृत्यू झाला त्यावेळी त्याच्या विशाल साम—ाज्याचा कुणी स्पष्ट वारसदार नव्हता. ‘अलेक्झांडर चौथा’ त्यावेळी आईच्या गर्भात होता आणि हेराक्लीज सिंहासनावर दावा करण्यासाठी वैध नव्हता. अखेर अलेक्झांडरचा सावत्र भाऊ अरहाइडियस राजा बनला. अलेक्झांडर चौथा याचा जन्म झाल्यावर त्याला सह-शासक बनवण्यात आले.

संबंधित बातम्या
Back to top button