पृथ्वीवर पाणी आले कुठून?; संशोधकांनी या रहस्यावरील पडदा हटवण्यासाठी केले महत्त्वाचे संशोधन | पुढारी

पृथ्वीवर पाणी आले कुठून?; संशोधकांनी या रहस्यावरील पडदा हटवण्यासाठी केले महत्त्वाचे संशोधन

वॉशिंग्टन : जीवसृष्टीला आवश्यक असणारी एक मूलभूत गोष्ट म्हणजे पाणी. पृथ्वीवर जीवसृष्टी विकसित होण्यामागेही पाण्याची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे. मात्र, पृथ्वीवर हे पाणी कुठून आले याचे संशोधकांना नेहमीच कुतुहल वाटत आले आहे. हे पाणी धूमकेतू, लघुग्रह यांच्या माध्यमातून पृथ्वीवर आले असावे असे म्हटले जाते. काहींना वाटते की पृथ्वीने स्वतःच पाणी विकसित केले आहे.

आता कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील संशोधकांनी याबाबतच्या रहस्यावरील पडदा हटवण्यासाठी एक महत्त्वाचे संशोधन केले आहे. त्यांच्या मते, पृथ्वी ही निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात कोरडी आणि खडकाळ सामग्रीने भरलेली होती. त्यावरून असे दिसते की पृथ्वीवरील पाणी हे नंतरच्या काळात आले.

पृथ्वीच्या निर्मितीच्या प्रक्रियेतील शेवटच्या 15 टक्के भागाच्या काळात तिच्यामध्ये पाणी आणि जीवनावश्यक घटक समाविष्ट झाले. मात्र, त्यांची निर्मिती कशी झाली हा अद्यापही संशोधनाचा विषय आहे. या संशोधनाच्या एका पद्धतीत पृथ्वीच्या अंतर्गत भागातील उष्ण मॅग्माची तपासणी करणे हे आहे. पृथ्वीच्या खोलीमध्ये थेट जाता येत नाही. मात्र, हा मॅग्मा लाव्हाच्या रूपाने पृथ्वीच्या पृष्ठभागावर येत असतो. मॅग्मा पृथ्वीच्या पोटात वेगवेगळ्या स्तरात असतो. मेंटलचा बाह्य स्तर पंधरा किलोमीटर खोलीपासून सुरू होतो आणि सुमारे 680 किलोमीटरपर्यंत असतो. मेंटलचा खालील स्तर 680 किलोमीटर ते 2900 किलोमीटरपर्यंत म्हणजेच कोअरच्या सीमेपर्यंत असतो. वेगवेगळ्या खोलीतील मॅग्माच्या संशोधनाने वैज्ञानिक पृथ्वीचे स्तर, संरचना आणि प्रत्येक स्तरातील रसायनांबाबत जाणून घेऊ शकतात. पृथ्वीची निर्मिती तत्काळ नव्हे तर कालौघात वेगवेगळ्या सामग्री आपापसात मिसळून होत गेली. त्याचा अर्थ पृथ्वीच्या मेंटलचा खालील स्तर आणि बाह्य स्तर हे पृथ्वीच्या निर्मितीविषयी माहिती देऊ शकतात. संशोधकांनी नव्या संशोधनात पृथ्वीच्या खोल भागातील पाण्यासहीत अस्थिर रसायनांच्या कमतरतेचा छडा लावला आहे. त्यावरून असे दिसते की एकेकाळी पृथ्वी कठीण खडकाळ पृष्ठभागाची व कोरडी होती.

Back to top button