चोरट्यांनी चोरले चक्क टोमॅटो! | पुढारी

चोरट्यांनी चोरले चक्क टोमॅटो!

बंगळूर : हल्ली कशाची चोरी होईल हे काही सांगता येत नाही. सध्या टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. टोमॅटोचे भाव वाढल्यानंतर नफेखोरांनी त्याचा काळाबाजारही सुरू केला आहे. टोमॅटोचे भाव चढे असल्याने ग्राहकांनीही खरेदी कमी केली आहे. सध्या बाजारात टोमॅटोचा भाव 100 ते 120 रुपये किलोवर पोहोचला आहे. अशा स्थितीत सर्वसामान्यांच्या भाज्यांची चवही बिघडली आहे. या दरम्यान आता चक्क शेतातून टोमॅटोची चोरी झाल्याच्या घटनाही समोर येऊ लागल्या आहेत. नुकतंच असंच एक प्रकरण आता कर्नाटकच्या हासन जिल्ह्यातून समोर आले आहे. यात एका शेतकर्‍याच्या शेतातून काही चोरांनी चक्क टोमॅटो पिकाची चोरी केली आहे.

एका महिला शेतकर्‍याने आरोप केला आहे की, कर्नाटकातील हासन जिल्ह्यातील हलेबिडू पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्‍या तिच्या शेतातून 4 जुलैच्या रात्री 2.5 लाख रुपये किमतीचे टोमॅटो चोरीला गेले. महिलेने आरोप केला आहे की, त्यांनी 2 एकर शेतजमिनीवर टोमॅटोचे पीक घेतले आहे. आता टोमॅटोचे पीकही काढणीला आले होते. भावही चांगले होते. हे पीक बाजारात नेण्याचे नियोजन केले होते. मात्र, त्याआधीच ते चोरी झाले. महिला शेतकर्‍याने सांगितले की, बंगळुरूमध्ये टोमॅटो 120 रुपये किलोने विकला जात आहे. अशा स्थितीत पीक काढून बाजारात विकावं, अशी योजना त्यांनी आखली होती. हिलेनं सांगितलं, की टोमॅटोचं पीक पिकवण्यासाठी त्यांनी मोठं कष्ट घेतलं होतं. सोबतच टोमॅटो पिकवण्यासाठी त्यांना कर्जही घ्यावं लागलं होतं. यावेळी त्यांचं टोमॅटोचं पीक चांगलं आलं होतं. सोबतच बाजारात टोमॅटोचे भाव जास्त असल्याने त्यांना चांगला नफा मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, चोरांनी त्याचा नाश करून संपूर्ण पीक चोरून नेले. महिलेने सांगितले, की चोरट्यांनी सुमारे 50-60 पोती टोमॅटो चोरून नेले आणि उरलेले पीक नष्ट केले. याप्रकरणी हलेबिडू पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Back to top button