लंडनमध्ये सापडला रोमन काळातील अनोखा मकबरा | पुढारी

लंडनमध्ये सापडला रोमन काळातील अनोखा मकबरा

लंडन : इंग्लंडची राजधानी लंडनमध्ये एका इमारतीच्या बांधकामासाठी करण्यात आलेल्या उत्खननावेळी अपघातानेच तब्बल दोन हजार वर्षांपूर्वीचा अत्यंत अनोखा असा मकबरा आढळून आला. मध्य लंडनमध्ये सापडलेला हा मकबरा ब्रिटनमधील अशा स्वरूपाच्या शोधांमध्ये सर्वात अनोखा ठरला आहे. याठिकाणी प्राचीन काळातील काही वस्तूही सापडल्या आहेत.

या मकबर्‍याला कमी उंचीच्या भिंती होत्या, प्रवेशासाठी काही पायर्‍या होत्या तसेच अंतर्गत भागात जमिनीवर दोन सुंदर मोझाईक होते. हे मोझाईक छोट्या लाल टाईल्सनी बनवले होते. प्रत्येक टाईलमध्ये फुलाची रचना होती. तसेच शंभरपेक्षा अधिक नाणीही मकबर्‍याच्या जमिनीवर पसरलेली होती. द म्युझियम ऑफ लंडन आर्कियोलॉजीमधील वरिष्ठ पुरातत्त्व संशोधक अँटोनिटा लेर्झ यांनी सांगितले की रोमन काळात शहरातील या भागात असणारी जीवनशैली कशी होती हे पाहण्यासाठी नवे संशोधन महत्त्वाचे ठरते.

सम्राट क्लौडियसच्या काळातील रोमन आक्रमणकार्‍यांनी लंडन किंवा लंडिनियम या शहराची स्थापना इसवी सन 47 च्या आसपास केली होती. पाचव्या शतकाच्या प्रारंभापर्यंत रोमन लोकांचेच या शहरावर राज्य होते. त्यानंतर अन्य राज्यांच्या आक्रमणांमुळे ब्रिटनमधून रोमन सत्ता हटवली गेली. रोमन काळात बांधलेल्या या मकबर्‍यामध्ये मुळात काही शवपेट्याही असाव्यात असे संशोधकांना वाटते. याठिकाणी संशोधकांना तांब्याचे ब्रेसलेटस्, काचेचे खडे, मातीची भांडी आणि हाडापासून बनवलेला कंगवाही सापडला आहे. रोमन काळातील लंडनचा इतिहास जाणून घेण्यासाठी हे संशोधन महत्त्वाचे ठरणार आहे.

Back to top button