‘नासा’ने शोधला पृथ्वीसारखाच जीवसृष्टीसाठी ‘आशादायक’ ग्रह | पुढारी

‘नासा’ने शोधला पृथ्वीसारखाच जीवसृष्टीसाठी ‘आशादायक’ ग्रह

वॉशिंग्टन : ‘नासा’च्या खगोलशास्त्रज्ञांनी पृथ्वीपासून केवळ 40 प्रकाशवर्ष अंतरावरच पृथ्वीइतक्याच आकाराचा व जीवसृष्टीबाबत ‘आशादायक’ असा बाह्यग्रह शोधला आहे. या बाह्यग्रहाचे नाव आहे ‘ग्लीज 12 बी.’ या ग्रहावरील तापमान राहण्यास योग्य ठरेल असे आहे. हा ग्रह एका लाल खुजा तार्‍याभोवती फिरतो. राहण्यास बर्‍याच अंशी अनुकूल असलेला हा खडकाळ, कठीण पृष्ठभागाचा ग्रह परग्रहावरील जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी चांगले ठिकाण असल्याचे संशोधकांना वाटते.

हा ग्रह आपल्या सौरमालिकेच्या जवळच आहे. तो एका छोट्याशा, तुलनेने थंड अशा लाल तार्‍याभोवती प्रदक्षिणा घालतो. ‘नासा’च्या ‘ट्रांझिटिंग एक्झोप्लॅनेट सर्व्हे सॅटेलाईट’ (टीईएसएस) या स्पेस टेलिस्कोपच्या साहाय्याने हा बाह्यग्रह शोधण्यात आला. त्याची रुंदी पृथ्वीच्या तुलनेत 1.1 पट आहे. पृथ्वी आणि शुक्र ग्रहाइतका त्याचा सर्वसाधारणपणे आकार आहे. पृथ्वी आणि शुक्राला आपल्या सौरमालिकेतील ‘जुळे ग्रह’ असे अनेक वेळा म्हटले जात असते. हा बाह्यग्रहसुद्धा असाच आहे. तो ‘ग्लीज 12’ या तार्‍याभोवती फिरतो. त्याचे आपल्या तार्‍यापासूनचे अंतर इतके कमी आहे की, त्याला आपली एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास केवळ 12.8 दिवस लागतात.

याचा अर्थ, त्याच्यावरील वर्ष हे पृथ्वीवरील केवळ 12.8 दिवसांइतके असते. अर्थात, ‘ग्लीज 12’ हा तारा आपल्या सूर्याच्या एक चतुर्थांश इतक्याच आकाराचा असल्याने तो सूर्यापेक्षा बराच थंडही आहे. त्यामुळे आपल्या तार्‍याच्या इतक्या जवळ असूनही या ग्रहावर बेसुमार उष्णता नाही. पृथ्वी आणि सूर्य यांच्यादरम्यानच्या अंतराच्या तुलनेत त्याचे तार्‍यापासूनचे अंतर केवळ 7 टक्के इतके आहे. या बाह्यग्रहावरील तापमान अधिक उष्णही नाही व थंडही नाही. त्यामुळे त्याच्या पृष्ठभागावर द्रवरूप पाण्याचे अस्तित्व राहू शकते. जीवसृष्टीसाठी पाणी हा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे आता संशोधकांचे लक्ष या बाह्यग्रहाकडे गेले आहे.

Back to top button