डॉ. तावरे, हाळनोरसह शिपायावर होणार कारवाई : आयुक्त अमितेश कुमार

डॉ. तावरे, हाळनोरसह शिपायावर होणार कारवाई : आयुक्त अमितेश कुमार

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात लाच स्वीकारून अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी आणि रक्ताचा बनावट खोटा अहवाल तयार केल्याप्रकरणी ससूनमधील फॉरेन्सिक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर आणि शवविच्छेदन विभागातील शिपायाला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्यानंतर आता या तिघांविरोधात प्रिव्हेन्शन करप्शन अ‍ॅक्टनुसार  ( भ्रष्टाचारविरोधी कलम) कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

लाच स्वीकारल्याने तिघांच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे. दाखल गुन्ह्यानुसार, कल्याणीनगरमध्ये एका अल्पवयीन मुलाने मद्य प्राशन करून त्याच्याकडील पोर्शे कारने दुचाकीवर निघालेल्या तरुण-तरुणीला उडविल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. अपघातानंतर त्याच्या वडिलांनी व आजोबांनी मिळून पोलिस, पोर्शे गाडीवर नेमण्यात आलेला कारचालक तसेच ससून रुग्णालयातील डॉक्टर यांना मॅनेज केले. सकाळी 8 वाजून 20 मिनिटांनी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर 9 वाजण्याच्या सुमारास मुलाला ससून रुग्णालयात नेण्यात आल्यानंतर तेथे डॉ. अजय तावरे, डॉ. हाळनोर यांनी मुलाच्या रक्तात अल्कोहोल आढळलेच नसल्याचा अहवाल दिला होता. मात्र, या प्रकरणात काही काळेबेरे होण्याची शक्यता व संशय पाहता पोलिसांनी गुपचुप मुलाचा दुसरा रक्ताचा नमुना घेतला होता. तसेच, मुलाच्या वडिलांचेही रक्ताचे नमुने घेऊन तीनही रक्ताच्या नमुन्यांची डीएनए टेस्ट करण्यास सांगितली होती.

त्यातील ससून रुग्णालयात मुलाच्या वडिलांचे डीएनए मॅच झाले नाही. मात्र, दुसरा गुपचुप घेतलेला रक्ताचा नमुना विशाल अगरवाल यांच्या डीएनएशी जुळला. अहवालानंतर ससून रुग्णालयातून मोठ्या प्रमाणावर प्रकरण मॅनेज केल्याचा संशय खरा ठरल्यानंतर पोलिसांच्या तपासात फॉरेन्सिक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर आणि शवविच्छेदन विभागातील शिपाई घटकांबळे यांचा रोल असल्याचे आढळून आले. त्यांच्याकडे करण्यात आलेल्या तपासात या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले. डॉ. श्रीहरीने तीन लाख रुपये घटकांबळेमार्फत स्वीकाल्याचे निष्पन्न झाले. तर, या सर्व प्रकरणाचा ससूनमधील अहवालात फेरफार करण्यातील मास्टर माइंड डॉ. तावरे असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याने हा प्रकार सरकारी नोकरदारांनी केल्याने त्यांच्यावर आता लाच स्वीकारल्याप्रकरणी भ्र ष्टाचाराच्या म्हणजेच प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन अ‍ॅक्टनुसार कलम वाढ करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

डॉ. तावरे प्रकरणात एसीबीची एन्ट्री?

डॉ. अजय तावरे याचे नाव अपघात प्रकरणातील आर्थिक व्यवहारानंतर समोर आले. त्याच्याभोवतीचा चौकशीचा फास आणखी आवळण्याची शक्यता वाढली आहे. डॉ. तावरे याने यापूर्वी भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचे काम केले आहे का? त्याआधारे त्याने माया कमावली असण्याची दाट शक्यता आता वर्तवली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) एन्ट्रीची शक्यता वाढली आहे. याबाबत एसीबीच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणात काही बोलता येणार नसल्याचे सांगितले आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांकडूनही प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन अ‍ॅक्टचे कलम लावले जाण्याच्या शक्यतेमध्ये वाढ झाली आहे. या प्रकरणात ज्ञात उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमवली का? याचाही तपास व सुमोटो अ‍ॅक्शन एसीबीकडून होऊ शकते.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news