वाहनांच्या ‘फिटनेस’साठी हजारोंचा दंड

वाहनांच्या ‘फिटनेस’साठी हजारोंचा दंड

[author title="राहुल हातोले " image="http://"][/author]

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : कोरोना महामारीच्या काळात अनेक उद्योगधंदे-व्यवसाय बुडाले. बेरोजगारीत आणखी भर पडली. यासोबतच प्रवासी वाहन चालविणार्‍यांचा व्यवसायही मंदावला. त्यामुळे वाहनांचा हप्ता भरणेही त्यांना अवघड होऊन बसले. तेव्हापासून रिक्षाचालकांसह प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनधारकांनी वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र काढले नाही. परिणामी केंद्राच्या नियमांमुळे आता प्रवासी वाहनचालकांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. यावर तोडगा काढत हा दंड माफ करावा अथवा दंडाची किमान रक्कम ठरवून द्यावी. जेणेकरून प्रवासी वाहतूक करणार्‍यांचे नैराश्य दूर होईल. असा सूर शहरातील रिक्षाचालकांमधून उमटत आहे.

योग्यता प्रमाणपत्र काढणे आवश्यकच

अपघात टळतील

योग्यता प्रमाणपत्र काढणे आवश्यकच आहे. अशा वाहनांमधून प्रवाशांची वाहतूक केली जात असल्याने संबंधित वाहनधारक अथवा मालकांनी वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. त्यामुळे वाहनांची सुव्यवस्था राखून होणारे अपघात टळतील.

दंड वाचणार

शहरात आरटीओचे वायुवेग पथक वाहनांची कागदपत्राची तपासणी करते. कागदपत्राची पूर्तता नसल्यास मोठा दंड आकारला जातो. तसेच केंद्रानेदेखील दिवसाला 50 रुपये दंड आकारणार असल्याचा आदेश काढला आहे. त्यामुळे हे सर्व दंड भरण्याऐवजी योग्यता प्रमाणपत्र काढणे आवश्यक आहे.

दंडाला नाही मर्यादा

केंद्राने दिवसाला आकारलेल्या दंडाला कुठलीच मर्यादा ठेवली नाही. किमान 50 रुपये तर कमाल मर्यादा नसल्याने दंडाची रक्कम लाखाहून अधिक भरावी लागणार आहे. त्याकारणाने एवढी मोठी रक्कम भरणे रिक्षाचालकास अशक्य असल्याचे दिसून येत आहे. यामुळे चालकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

केंद्राने जाहीर केलेला आदेश प्रवासी वाहनधारकांची आर्थिक पिळवणूक करणारा आहे. त्यामुळे रिक्षाचालकांच्या व्यवसायावर कुर्‍हाड पडणार आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांत हा निर्णय रद्द करा. अन्यथा शहरासह संपूर्ण राज्यभर चक्का जाम केला जाईल.

– बाबा कांबळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य रिक्षा पंचायत, पुणे.

योग्यता प्रमाणपत्राशिवाय वाहन चालविणे बेकायदा आहे. अशा वाहनांवर आरटीओच्या वायुवेग पथकाकडून दंडात्मक कारवाई होते; तसेच या प्रकारची वाहने रस्त्यावरून धावणे चालकांसह प्रवाशांचा जीवावर बेतू शकते. त्यामुळे शहरातील प्रवासी वाहतूक करणार्‍यांनी दंड भरून योग्यता प्रमाणपत्राचे नूतनीकरण करावे आणि होणारी कारवाई टाळावी.

– अतुल आदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड.

कोरोना काळात ओढावलेल्या संकटामुळे मोठे नुकसान झाले. तेव्हापासून मी प्रवासी वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र काढू शकलो नाही. आता नव्या कायद्यामुळे दंडाची रक्कम जुन्या रिक्षाच्या किंमतीहून अधिक झाली आहे. 92 हजार रुपये एवढी दंडाची रक्कम भरावी लागणार आहे. ही रक्कम आता कशी भरावी हे मोठे संकट उभे राहिले आहे. शहरात रिक्षांची संख्या वाढली आहे. दिवसाला लागणारा खर्चदेखील निघत नसल्याने कुटुंबाचा चरितार्थ चालविणे अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत वाहनाच्या योग्यता प्रमाणपत्राचा दंड कसा भरणार?

– रिक्षाचालक, पिंपरी.

आरटीओकडून योग्यता प्रमाणपत्रासाठी वाहन सुस्थितीत असावे लागते. त्यासाठी वाहनाचा विमा काढणे, हेडलाइट, मीटर पासिंग आवश्यक आहे; मात्र यासाठी लागणारा खर्च परवडत नाही. दिवसाकाठी तेवढी रक्कम मिळत नाही. यातच भर म्हणजे वाहन योग्यता प्रमाणपत्राचा दंड 55 हजार 500 रुपये इतका भरावा लागणार आहे. दंड भरणे सद्यस्थितीत परवडत नाही.

– रिक्षाचालक, पिंपरी.

केंद्राचा निर्णय

केंद्र शासनाच्या निर्णयानुसार प्रवासी संवर्गातील वाहनांना योग्यता प्रमाणपत्राच्या नूतनीकरणासाठी विलंब झाल्यास 50 रुपये प्रतिदिन दंड आकारण्यात येणार असल्याचा आदेश काढण्यात आला. त्यामुळे राज्यासह पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनचालक, मालकांवर आर्थिक संकट कोसळल्याची भावना संबंधित संस्था-संघटनाकडून व्यक्त होत आहेत. या निर्णयास शहरामधून विरोध निर्माण झाला असून, या विरोधात आरटीओ कार्यालयासमोर आंदोलन केले जात आहेत.

अद्यापपर्यंत दंडाची रक्कम नव्हती

नवीन प्रवासी वाहनांना सुरुवातीचे आठ वर्षे योग्यता प्रमाणपत्र काढण्याची आवश्यकता नव्हती. त्यानंतर दर दोन वर्षाला आणि पुढे दरवर्षी हे योग्यता प्रमाणपत्र काढण्यात यावे, असा नियम होता. मात्र कुठलीच दंडाची रक्कम आकारली जात नव्हती; मात्र नव्या आदेशानुसार आता प्रतिदिन दंड आकारला जात आहे.

रिक्षांची संख्या वाढल्याने चालक त्रस्त

आरटीओकडून वर्षभरात परमीटचे वाटप मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यामुळे शहरात रिक्षांची संख्या वाढली आहे. परिणामी दिवसाला मिळणारा रोजगार कमी झाला आहे.

विम्यासाठी आवश्यक

विमा काढताना अनेक कंपन्या या प्रमाणपत्राची मागणी करतात. याशिवाय वाहन रस्त्यावर चालविणे असुरक्षित असल्याचे मानले जाते. त्यामुळे वाहनांमध्ये बिघाड कमी होतात; तसेच अपघातदेखील कमी होतात.

विमा क्लेम होण्यास अडचणी : एखाद्या वाहनाचा अपघात झाल्यावर त्या चालकाकडे प्रमाणपत्र नसल्यास इन्शुरन्स क्लेम करताना अनेक अडचणी निर्माण होतात.

प्रदूषण कमी होण्यास मदत : योग्यता प्रमाणपत्र काढताना वाहनांद्वारे होणारे प्रदूषण नियंत्रणात आहे की, नाही याची तपासणी केली जाते. त्यामुळे साहजिकच शहरातील प्रदूषण कमी होऊ शकते.

योग्यता प्रमाणपत्रासाठीचे दर

१. लहान वाहन (अ‍ॅटो रिक्षा, छोटा हत्ती, सर्व तीनचाकी) – 600/

२. मोठी अवजड वाहने (बस, ट्रेलर्स) – 800

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news