आता आली चक्क त्रिकोणी चाकांची सायकल | पुढारी

आता आली चक्क त्रिकोणी चाकांची सायकल

लंडन : काही दिवसांपूर्वी चौकोनी चाकांची सायकल चर्चेचा विषय बनली होती. आता चक्क त्रिकोणी चाकांची सायकल बनवण्यात आली आहे. सेर्गी गॉर्डिएव्ह नावाच्या या संशोधकाने ही त्रिकोणी चाकांच्या सायकलची संकल्पना मांडली आहे. सेर्गी गॉर्डिएव्हने त्याच्या ‘द क्यू’ नावाच्या यू ट्यूब चॅनेलवरून यासंदर्भातील एक व्हिडीओच पोस्ट केला आहे.

साचेबद्ध विचारसणीहून वेगळ्या मात्र पूर्णपणे वापर करता येईल अशा संकल्पना मांडणारे संशोधक म्हणून सेर्गी गॉर्डिएव्ह यांची ओळख आहे. खासकरून सायकलबद्दलच्या सेर्गी गॉर्डिएव्ह यांच्या संकल्पना आणि संशोधन चर्चेत असतात. त्यांनी बर्फावर चालणारी सायकलही बनवली आहे. तसेच जगातील सर्वात छोटी सायकल बनवण्यासाठीही त्यांनी मदत केली आहे. आता तर सेर्गी गॉर्डिएव्ह यांनी चक्क त्रिकोणी चाकं असलेल्या सायकलची संकल्पना मांडली असून हे पाहून त्यांचं काम फॉलो करणारे अनेकजण थक्क झाले आहेत. चौकोनी चाकांची जशी चर्चा झाली होती तशीच आता या त्रिकोणी चाकांची चर्चा सुरु झाली आहे. ट्विटरवरून काहींनी सेर्गी गॉर्डिएव्ह यांचं कौतुक केलं आहे तर काहींनी याची काय गरज असं म्हटलं आहे.

आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की त्रिकोणी चाकांची सायकल चालणार तरी कशी? तर ही चाकं बनवताना सेर्गी गॉर्डिएव्ह यांनी आपलं इंजिनिअरिंगचं कौशल्य वापरलं आहे. ही त्रिकोणी चाकं रियुलो ट्रँगलच्या आकारात आहेत. अगदीच सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास ही चाकं सरळ रेषेतील त्रिकोण नसून कोनांच्या इथे गोलाकार कडा असलेली आहेत. ‘गोलाकार त्रिकोण त्यांची जाडी समान असेल. वर्तुळ सोडल्यास हा सर्वात सोपा आणि उत्तम आकार आहे,’असं सांगितलं जातं. म्हणजेच अशा त्रिकोणी चाकांचा वापर करुन रस्त्यावर सायकल अधिक कार्यक्षमपणे चालवता येईल. कोणत्याही सामान्य सायकलप्रमाणेच ही सायकल चालते. प्रथमदर्शनी ही सायकल चालणारच नाही असं तिच्या चाकांकडे पाहून वाटतं. मात्र, प्रत्यक्षात ही सायकल फारच सहज चालवता येते. या चाकांना वरच्या बाजूच्या प्लॅटफॉर्मवर लावलेल्या आणि गोलाकार फिरणार्‍या ट्यूब्समुळे पुढे जाण्याची गती मिळते. फक्त कोनांकडून फ्लॅट सर्फेस असलेल्या बाजूला चाक जमीनीला टेकलं की सायकलचा वेग वाढतो.

Back to top button