मंगळावर ऑक्सिजनसंपन्न खडकांचा शोध | पुढारी

मंगळावर ऑक्सिजनसंपन्न खडकांचा शोध

वॉशिंग्टन ः मंगळभूमीवर एका प्राचीन व सध्या कोरड्या असलेल्या जलाशयाच्या काठावर अनेक दगडे विखरून पडलेली आहेत. ही दगडे असे सुचवतात, की एके काळी मंगळ ग्रह सध्याच्या अनुमानापेक्षाही अधिक प्रमाणात पृथ्वीसारखाच होता! ‘नासा’च्या क्युरिऑसिटी रोव्हरने या दगडांचा शोध घेतला आहे. हे दगड असामान्यपणे मँगेनीज ऑक्साईडने संपन्न आहेत. याचा अर्थ एके काळी मंगळावर पृथ्वीइतकीच ऑक्सिजनची पातळी होती व तो ग्रह राहण्यास योग्य होता. जीवसृष्टीला पोषक असेच वातावरण त्यावेळी मंगळावर होते.

पृथ्वीवरील मँगेनीजला ‘जीवसृष्टीच्या उत्क्रांतीच्या घटनेतील नायक’ असे संशोधकांकडून म्हटले जाते. पृथ्वीवर 4 अब्ज वर्षांपूर्वी जीवांचे प्राथमिक स्वरूप उदयाला आले. त्या काळात महासागरांमध्ये तसेच खडकांमध्ये मँगेनीज अस्तित्वात होते, असे पृथ्वीचा भूगर्भीय इतिहास सांगतो. त्यामधूनच बहुतांश जीवांसाठी आवश्यक असणार्‍या ऑक्सिजनचा मार्ग खुला झाला. मँगेनीज ऑक्साईड तयार होण्यासाठी एक तर स्वतंत्र ऑक्सिजन उपलब्ध असावा लागतो किंवा मग सूक्ष्म जीवांचे अस्तित्व असावे लागते.

मात्र, मंगळावर सूक्ष्म जीवांच्या रूपात का होईना एके काळी जीवसृष्टी होती, याबाबतचे ठोस पुरावे अद्याप सापडलेले नाहीत. त्यामुळे या खडकांमध्ये मँगेनीज ऑक्साईड कसे अस्तित्वात आहे, याबाबतचे कुतूहल संशोधकांमध्ये आहे. पृथ्वीवर असे मँगेनीज ऑक्साईडयुक्त खडक निर्माण होणे हे सोपे आहे. त्यामागे सूक्ष्मजीवांचे तसेच ऑक्सिजनचेही कारण आहे. मात्र, मंगळाबाबत हे सर्व काही रहस्यमयच आहे, असे न्यू मेक्सिकोच्या लॉस अलामोस लॅबोरेटरीतील संशोधक पॅट्रिक गॅस्डा यांनी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button