क्रोएशियात सापडले 2500 वर्षांपूर्वीचे हेल्मेट | पुढारी

क्रोएशियात सापडले 2500 वर्षांपूर्वीचे हेल्मेट

लंडन ः क्रोएशियातील पुरातत्त्व संशोधकांना उत्खननात तब्बल 2500 वर्षांपूर्वीच्या इलिरियन हेल्मेटचा म्हणजेच शिरस्त्राणाचा शोध लागला आहे. गोमाईल आर्कियोलॉजिकल साईटवर एका दफनस्थळी विशिष्ट अशा दगडी रचनेत हे हेल्मेट ठेवलेले होते. त्यावरून ते अर्पण केलेले असावे, असे संशोधकांना वाटते.

हे हेल्मेट इसवी सनापूर्वीच्या सहाव्या शतकाच्या अखेरच्या काळातील ते इसवी सनापूर्वीच्या चौथ्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील असावे. झाग्रेब युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे. गोमाईलच्या साईटवर अनेक दफनस्थळे आहेत. हे ठिकाण अ‍ॅड्रियाटिक समुद्राजवळील झॅकोटोरॅक नावाच्या गावाजवळ आहे. दफनभूमीच्या अनेक टेकड्या तिथे आहेत. एका टेकडीत अनेक थडगी आहेत. प्रत्येक थडग्यात एकच नव्हे तर अनेकांना दफन केलेले होते.

एके काळी या भागात ग्रीक लोक ज्यांना ‘इलिरियन्स’ या नावाने संबोधत होते, असे लोक राहत होते. त्यांच्या काळातील हे शिरस्त्राण आहे. या लोकांच्या अनेक टोळ्या व राज्ये होती. हळूहळू या सर्व लोकांना रोमन लोकांनी जिंकून घेतले. या लढाया इसवी सनपूर्व 229 ते इसवी सन पूर्व 168 या काळात झाल्या. आता जे हेल्मेट सापडले आहे ते अडीच हजार वर्षांनंतरही सुस्थितीत आहे, हे विशेष!

हेही वाचा 

Back to top button