…म्हणून मंगळावर नाही जीवसृष्टी! | पुढारी

...म्हणून मंगळावर नाही जीवसृष्टी!

वॉशिंग्टन : पृथ्वीच्या शेजारचा मंगळ ग्रह नेहमीच मानवाला आकर्षित करीत आलेला आहे. या लाल ग्रहावर जीवसृष्टी का नाही याचे कारण आता ‘नासा’ने स्पष्ट केले आहे. मंगळ ग्रहाच्या केंद्रामधील सिस्मिक वेव्ज (भूकंपीय लहरी) याचे कारण आहेत. या लहरींमुळेच माणूस तिथे राहू शकत नाही. ‘नासा’ने मंगळावर 2018 मध्ये ‘इनसाईट लँडर’ पाठवले होते. त्याने गोळा केलेल्या डाटामधून याबाबतची माहिती समोर आली आहे.

मंगळाच्या पोटात कोणते घटक आहेत याची माहिती या डाटामधून संशोधकांना दिसली. त्यानुसार मंगळाच्या केंद्रात वितळलेले लोखंड तसेच अन्य धातू, घटक आहेत. त्यामध्ये गंधक आणि ऑक्सिजन सर्वाधिक आहेत. सुमारे 4.6 अब्ज वर्षांपूर्वी मंगळ ग्रह कसा बनला आणि तो पृथ्वीपेक्षा कसा वेगळा आहे हे या डाटामधून दिसून आले. अनेक बाबतीत साम्य असले तरी पृथ्वीवर जशी जीवसृष्टी शक्य आहे तशी मंगळावर नाही हे स्पष्ट झाले आहे. मेरीलँड युनिव्हर्सिटीतील संशोधक वेदरन लेकिक आणि त्यांच्या टीमने मंगळावरील दोन भूकंपीय घटनांना ट्रॅक केले. पहिली घटना म्हणजे मंगळावर येणारे भूकंप आणि दुसरी म्हणजे अंतराळातील एखाद्या खगोलाची मंगळाला धडक होऊन निर्माण होणार्‍या भूकंपीय लहरी.

भूकंपीय लहरींना मंगळाच्या पृष्ठभागावरील अन्य लहरींसमवेत ग्रहाच्या कोअरमधून जाण्यास किती वेळ लागतो हे पाहण्यात आले. त्यामधून मंगळावरील पदार्थांच्या घनत्व आणि त्याच्या दाबाची क्षमता यांची माहिती समजली. त्यामधून दिसून आले की मंगळाचे केंद्र पूर्णपणे वितळलेले आहे. उलटपक्षी, पृथ्वीच्या केंद्राचा बाहेरील भाग कठीण आणि आतील भाग वितळलेला आहे. संशोधकांना मंगळाच्या केंद्रात सल्फर आणि ऑक्सिजनही मिळाले आहे. त्यावरून दिसून येते की मंगळाचे केंद्र पृथ्वीच्या केंद्रापेक्षा कमी घनत्वाचे आहे.

संशोधक निकोलस श्मेर यांनी सांगितले की कोणत्याही ग्रहाच्या केंद्रापासूनच त्याची निर्मिती आणि विकासाचा छडा लागतो. त्यावरूनच ग्रहावर जीवसृष्टीची निर्मिती व तिची धारणा बनण्यासारखी स्थिती आहे की नाही हे समजते. पृथ्वीच्या केंद्रात चुंबकीय क्षेत्र बनते जे आपल्याला सौरवादळांच्या प्रभावापासून वाचवते. मंगळावर अशी स्थिती नाही. त्यामुळे तिथे जीवसृष्टी शक्य नाही!

Back to top button