ब्राझीलमधील डायनासोर पेलिकन पक्ष्यासारखे खात होता! | पुढारी

ब्राझीलमधील डायनासोर पेलिकन पक्ष्यासारखे खात होता!

बर्लिन : पेलिकन पक्ष्याच्या लांबलचक चोचीपैकी खालच्या चोचीखाली एक भली मोठी पिशवी असते. ही पिशवी जणू काही मासे पकडण्यासाठीची जाळीच असते. हा पक्षी ज्याप्रमाणे पाण्यात मासे पकडून खातो तशाच पद्धतीने भक्षण करणारा डायनासोर ब—ाझीलमध्ये एकेकाळी वावरत होता. हा मोठ्या आकाराचा डायनासोर ‘स्पिनोसॉरस’ कुळातील होता. पाण्यात आपला खालचा जबडा फैलावून तो पेलिकन पक्ष्याप्रमाणेच आपले भक्ष्य पकडत होता, अशी माहिती युरोपियन संशोधकांनी दिली आहे. मात्र, हे संशोधन सध्या वेगळ्याच कारणामुळे वादातही सापडले आहे. या डायनासोरचे जीवाश्म ब—ाझीलमधून बेकायदेशीररीत्या हलवले असल्याचा आरोप होत आहे. ते पुन्हा ब—ाझीलकडे देण्यात यावे, अशी मागणीही काही पॅलिओंटोलॉजिस्टनी केली आहे.

‘स्पिनोसॉरीडी’ कुळातील ‘इरिटेटर चॅलेंजरी’ या प्रजातीमधील हा डायनासोर होता. हे डायनासोर दोन पायांचे व मांसाहारी होते. मगरीसारखेच त्यांचे तोंड लांबलचक होते. त्यांची कमाल लांबी 21 फूट होती. ब—ाझीलच्या अ‍ॅरेराईप बेसिनमध्ये अशा 115 दशलक्ष वर्षांपूर्वीच्या डायनासोरचे जीवाश्म मिळाले होते. त्याचे वर्णन 1996 मध्ये प्रथमतः करण्यात आले. कालांतराने हे जीवाश्म जर्मनीला नेण्यात आले होते. सध्या ते बाडेन-वुटेम्बर्ग येथील स्टुटगार्ट म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री येथे ठेवण्यात आले आहे. त्याच्याबाबतच्या नव्या संशोधनाची माहिती ‘पॅलियोंटोजिया इलेक्ट्रोनिका’ या नियतकालिकात देण्यात आली आहे. संशोधकांनी त्याच्या कवटीला डिजिटली नवे रूप दिले. त्यावरून त्याचे तोंड, जबडा कसा होता व तो कसे भक्षण करीत होता याबाबतचे कयास नोंदवण्यात आले.

Back to top button