युरेनसच्या चार चंद्रांवर छुपे समुद्र? | पुढारी

युरेनसच्या चार चंद्रांवर छुपे समुद्र?

लंडन : आपल्या ग्रहमालिकेतील एक ग्रह म्हणजे युरेनस. त्याच्या सर्वात मोठ्या चंद्रापैकी चार चंद्रांवर बर्फाळ पृष्ठभागाखाली लपलेले समुद्र असावेत, असे संशोधकांनी म्हटले आहे. ‘व्होएजर’ यानाने पाठवलेल्या डाटाचे पुन्हा एकदा विश्लेषण केल्यानंतर त्यांनी हा अंदाज व्यक्त केला आहे.

व्होएजर हे यान 1980 च्या दशकात युरेनसजवळून गेले होते. त्यावेळी युरेनसच्या एरियल, युम्ब्रेल, टायटॅनिया आणि ओबेरॉन या चंद्रांचेही निरीक्षण नोंदवले गेले. हे युरेनसचे सर्वात मोठ्या आकाराचे चंद्र आहेत. हे चंद्र द्रवरूप पाण्याचा समुद्र धारण करण्याइतके ऊबदार आहेत असे दिसून आले होते. टायटॅनिया आणि ओबेरॉन हे चंद्र तर जीवसृष्टीला पोषक होईल अशा तापमानाचे असल्याचे आढळले. याबाबतच्या संशोधनाची माहिती जियोफिजिकल रिसर्च नियतकालिकात देण्यात आली आहे.

‘नासा’च्या जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीतील ज्युली कॅस्टिलो-रोगेझ यांनी सांगितले की खुजे ग्रह तसेच चंद्र यांच्यासारख्या छोट्या आकाराच्या खगोलांबाबत अभ्यास करीत असताना बर्‍याच वेळा अनपेक्षित गोष्टीही समोर येत असतात. अनेक अनपेक्षित ठिकाणीही महासागरांचे पुरावे आढळलेले आहेत. त्यामध्ये सेरेस व प्लुटोसारख्या खुजा ग्रहांचा तसेच शनीच्या मिमाससारख्या चंद्राचाही समावेश आहे.

Back to top button