आता ‘एआय’चे ‘गॉडफादर’ बनले चिंतातूर! | पुढारी

आता ‘एआय’चे ‘गॉडफादर’ बनले चिंतातूर!

न्यूयॉर्क : शाळेत असताना आपण ‘विज्ञान : शाप की वरदान?’ अशा थाटाचे निबंध लिहीत होतो. सध्या ‘मोबाईल : शाप की वरदान’ व तत्सम विषय येत आहेत. खुद्द मोबाईल फोनचे जनक मार्टिन कुपर यांनी मोबाईल फोनच्या आहारी गेलेली माणसे आणि मोबाईलचा होत असलेला गैरवापर पाहून चिंता व्यक्त केली होती. सध्या ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ म्हणजेच ‘एआय’ किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेचा बोलबाला आहे. ‘एआय’ असलेले अनेक चॅटबॉट सध्या येत आहेत व थक्क करणारी कामगिरी करीत आहेत. अशावेळी ‘एआय’चे ‘गॉडफादर’ असे ज्यांना म्हटले जाते त्या जेफ्री हिंटन यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

‘एआय’ चे नवीन टूल ‘चॅट जीपीटी’मुळे मानवी जीवन खूप सुकर आणि सोप्या होतील अशा विविध गोष्टी घडू लागल्या आहेत. पण ‘एआय’ तंत्रज्ञानावर काम करणारे आणि त्याची निर्मित करणारे जेफ्री हिंटन, ज्यांना जग ‘एआय’चे गॉडफादर म्हणून ओळखते. त्यांनी या तंत्रज्ञानाचे धोके समजावून सांगत आपल्या कामाबद्दल खंत व्यक्त केली आहे. हिंटन यांनी नुकताच गुगल कंपनीमधील आपल्या पदाचा राजीनामा दिला. जेफ्री हिंटन यांनी 2018 मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेन्स क्षेत्रातील कार्यासाठी त्यांच्या सहायकांसह ट्यूरिंग अ‍ॅवॉर्ड जिंकला. तेव्हापासून ‘एआय’ तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी प्रगती सुरू झाली. यावर आता हिंटन म्हणाले की, त्यांना त्यांच्या आयुष्यातील कामातील एका गोष्टीची चिंता सतावतेय.

एका मुलाखतीत हिंटन यांनी ‘एआय’मधील अडचणींबाबत खुलासा केला आहे. जेेफ्री हिंटन यांनी न्यूरल नेटवर्क्सवरील त्यांच्या चांगल्या कामासाठी कम्प्यूटिंगमधील नोबेल पुरस्कार मिळाला आहे. द व्हर्जने दिलेल्या वृत्तानुसार, हिंटन म्हणाले की, मी स्वत:ला समजावत राहतो की, जर मी ‘एआय’ वर काम केले नसते तर कोणीतरी ते केलेच असते; पण या तंत्रज्ञानाचा गैरवापर होण्यापासून किंवा वाईट लोकांच्या हाती जाण्यापासून कसे रोखू शकतो, याबाबत चिंता सतावतेय. हिंटन हे गेल्या 10 वर्षांहून अधिक काळ ‘गुगल’मध्ये काम करत होते.

हिंटन म्हणाले की, ‘एआय’च्या क्षेत्रातील स्पर्धा थांबवणे अशक्य होऊ शकते, कारण इंटरनेटवर इतक्या खोट्या इमेज, फोटो, व्हिडीओ आणि टेक्स्ट कॉपी आहेत, ज्या पाहून यातील कोणत्या खर्‍या आणि कोणत्या खोट्या या ओळखणे कठीण आहे. हिंटन आणि त्यांच्या दोन विद्यार्थ्यांनी सुरू केलेली कंपनी अधिग्रहणानंतर ‘गुगल’ मध्ये सामील झाली, त्यांचा एक विद्यार्थी ‘ओपन एआय’मध्ये मुख्य शास्त्रज्ञ बनला. यानंतर हिंटन आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी एक न्यूरल नेटवर्क विकसित केले, ज्याद्वारे हजारो फोटोंचे विश्लेषण केले जे कुत्रा, मांजर, कार आणि फुले यासारख्या सामान्य वस्तू ओळखण्यास शिकवत होते. याच कामातून अखेरीस ‘चॅटजीपीटी’ आणि ‘गुगल बार्ड’ ची निर्मिती झाली.

Back to top button