मंगळावर चक्क माशाचे जीवाश्म? | पुढारी

मंगळावर चक्क माशाचे जीवाश्म?

वॉशिंग्टन : मंगळभूमीची छायाचित्रे पाहून अनेकांना त्यामध्ये अनेक गोष्टींचा आभास झालेला आहे. डोंगर उतरत असलेल्या व्यक्तीपासून ते घरापर्यंत आणि विविध प्राण्यांचेही आभास अशा फोटोंमध्ये झालेले आहेत. अर्थातच ‘नासा’ने या सर्व गोष्टींचे खंडन केले होते. आताही मंगळावरील एका छायाचित्रात चक्क माशाचे जीवाश्म असल्याचे अनेकांना वाटले!

‘नासा’च्या ‘क्युरिऑसिटी’ या रोव्हरने मंगळावरील अनेक विचित्र खडकांची छायाचित्रे टिपलेली आहेत. अनेक खडकांची रचना ही प्राचीन काळातील प्राण्यांच्या जीवाश्मासारखी दिसून येते. मंगळावरील 154 किलोमीटर लांबीच्या गेल क्रेटरमधील एका दगडाच्या छायाचित्रामध्ये त्याला काही काटे असल्यासारखे दिसून आले. क्युरिऑसिटीने मास्ट कॅमेरा आणि केमकॅमचा वापर करून हे छायाचित्र टिपले आहे. हे छायाचित्र पाहून अनेकांना ते एखाद्या प्राचीन माशाचे जीवाश्म असावे असे वाटले. काहींना वाटले की ते देवदार वृक्षाच्या फांदीसारखे आहे.

गेल क्रेटर या विवरात काही खडकांमध्ये हाडांसारखी संरचनाही दिसली आहे. एके काळी मंगळावरही मोठे तलाव होते तसेच वाहत्या नद्याही होत्या असे आढळून आले आहे. आजही त्याच्या पृष्ठभागाखाली पाण्याचे अस्तित्व असावे अशी शंका संशोधकांना वाटते. तेथील पाणी व जीवसृष्टीच्या इतिहासाबाबत सातत्याने संशोधन सुरू असते. गेल क्रेटर हे मंगळावरील सर्वात मोठ्या तलावाच्या जागांपैकी एक आहे. त्याची उत्पत्ती 3.5 ते 3.8 अब्ज वर्षांपूर्वी झाली होती.

Back to top button