शरीरातील लाखो वर्षांपूर्वीचे ‘विषाणू’ लढतात कर्करोगाशी! | पुढारी

शरीरातील लाखो वर्षांपूर्वीचे ‘विषाणू’ लढतात कर्करोगाशी!

लंडन : मानवी डीएनएमध्ये लाखो वर्षांपूर्वीच्या विषाणूंचे अवशेष लपून बसलेले असतात. हे अवशेष मानवी शरीराला कर्करोगाशी लढण्यास मदत करतात असे संशोधकांनी म्हटले आहे. फ्रान्सिस क्रिक इन्स्टिट्यूटच्या संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे. ज्यावेळी शरीरात कर्करोगाच्या पेशी नियंत्रणाबाहेर जातात त्यावेळी अशा जुन्या विषाणूंचे अवशेष सक्रिय होतात.

हे जुने विषाणू कोणत्याही हेतूशिवाय शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला मदत करतात आणि ट्यूमरवर हल्ला करतात. कर्करोगावर प्रभावी उपचार करण्यासाठी या संशोधनाच्या मदतीने लस विकसित करता येऊ शकेल असे संशोधकांना वाटते. केवळ कर्करोगाचा सामना करण्यासाठीच नव्हे तर कर्करोग होऊ नये यासाठीही अशी लस बनवली जाऊ शकेल. संशोधकांना फुफ्फुसाचा कर्करोग आणि रोगप्रतिकारक यंत्रणेतील एक भाग असलेल्या ‘बी-सेल्स’मध्ये संबंध दिसून आला आहे.

अशा पेशी ट्यूमरभोवती गोळा झालेल्या असतात. त्या अँटीबॉडीज तयार करतात आणि संक्रमणाचाही सामना करतात. ‘कोव्हिड’चा सामना करण्यासाठीही या पेशी आपले योगदान देत असतात. फ्रान्सिस क्रिक इन्स्टिट्यूटमधील प्रा. ज्युलियन डाऊनवर्ड यांनी याबाबतची माहिती दिली आहे. मानवी डीएनएचा 8 टक्के भाग हा अशा प्राचीन विषाणूंपासून विकसित झालेला असतो, हे विशेष. त्याचा शरीराला लाभच होत असतो व शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होत असते.

Back to top button