ब्रिमॅटो या एकाच झाडाला लागली वांगी आणि टोमॅटो! | पुढारी

ब्रिमॅटो या एकाच झाडाला लागली वांगी आणि टोमॅटो!

नवी दिल्ली : भारतीय कृषी संशोधन परिषदेतील संशोधक काही तरी वेगळे करण्याचा सातत्याने प्रयत्न करीत असतात. वाराणसीतील ‘आयसीएआर’च्या संशोधकांनी आता अशीच अनोखी गोष्ट केली आहे. त्यांनी कलम प्रक्रियेद्वारे अशी वनस्पती विकसित केली आहे जिला एकाच वेळी टोमॅटो आणि वांगीही लागतील. या झाडाला त्यांनी ‘ब्रिमॅटो’ असे नाव दिले आहे.

वाराणसीतील ‘आयसीएआर’ आणि भारतीय भाजीपाला संशोधन संस्थेने यापूर्वी कलम प्रक्रियेनेच ‘पोमॅटो’चीही निर्मिती केली होती. या झाडाला बटाटे आणि टोमॅटो लागतात. आता तयार केलेल्या ‘ब्रिमॅटो’ साठी 25 ते 30 दिवसांची वांग्याची रोपे आणि 22 ते 25 दिवसांची टोमॅटोची रोपे यांचे कलम केले आहे.

‘आयसी 111056’ या वांग्याच्या वाणातील पाच टक्के रोपांमध्ये दोन शाखा विकसित करण्याची क्षमता असते. त्याचाच लाभ घेऊन स्प्लिक्स पद्धतीने कलम करण्यात आले. मूळ वांग्याच्या झाडाला तिरपा छेद देऊन (45 अंशाच्या कोनात) त्यामध्ये टोमॅटोची फांदी बांधून हे ‘ग्राफ्टिंग’ म्हणजे कलम करण्यात आले. रोपांना पाच ते सात दिवस नियंत्रित वातावरणात ठेवण्यात आले.

त्यानंतर पाच ते सात दिवस त्यांना समप्रमाणात सूर्यप्रकाश आणि सावली देण्यात आली. कलम केलेल्या रोपांची पंधरा ते अठरा दिवसांनी शेतात लावण करण्यात आली. त्यानंतर साठ ते 70 दिवसांनी एकाच झाडाला टोमॅटो आणि वांगी लागली. ब्रिमॅटोच्या एका झाडापासून 2.383 किलो टोमॅटो आणि 2.64 किलो वांग्यांचे उत्पादन मिळाले.

Back to top button