श्वानासाठी बनवला 7 लाखांचा काचेचा महाल

श्वानासाठी बनवला 7 लाखांचा काचेचा महाल

मेरठ : आपण आपल्या आसपास अनेक प्राणीप्रेमी व्यक्ती पाहिलेल्या असतात. त्यांचे प्राणीप्रेम कौतुकास्पद असते. यातील काही प्राणीप्रेमी अगदी आपले सर्वस्व पणाला लावतात, ते मात्र अर्थातच थक्क करणारे असते. मेरठमधील डॉ. शमीम अहमद हे देखील यापैकीच एक असून त्यांनी आपल्या अ‍ॅलेक्स या श्वानासाठी घरातच आधुनिक सुविधा असलेला रिसॉर्ट तयार केला आहे. मेरठच्या ट्रान्सलाम कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये हा डॉग रिसॉर्ट उभारलेला आहे. येथे डॉ. शमीम यांनी त्यांचा लाडका श्वान अ‍ॅलेक्स आणि इतर प्राण्यांसाठी सर्व व्यवस्था केली आहे.

डॉ. शमीम अहमद हे उत्तर प्रदेशातील मेरठ येथील रहिवासी आहेत. त्यांनी काही वर्षांपूर्वी अ‍ॅलेक्सची सुटका केली होती आणि तेव्हा त्याच्यासाठी झोपडी बांधली होती. यात श्वानासाठी अनेक सुविधा आहेत, पण वाढती उष्णता पाहून डॉ. शमीम अहमद यांनी आता अ‍ॅलेक्ससाठी काचेचा महाल बांधला. त्याला अ‍ॅलेक्स रिसॉर्ट असे नाव देण्यात आले आहे. हे घर तयार करण्यासाठी सात लाखांहून अधिक रुपये खर्च झाले आहेत, असे ते म्हणाले.

डॉ. शमीम याबद्दल म्हणतात, अ‍ॅलेक्स रिसॉर्टच्या सुविधांबद्दल सांगायचे झाले तर, हे संपूर्ण घर काचेचे आहे. या काचेच्या घरात एसी, पंखा, डबल बेड, मऊ गादी यासह अनेक आधुनिक सुविधा आहेत. इतकेच नव्हे तर, स्विमिंग पूल, पाळणा, गाण्यासाठी होम थिएटर, कारंजे आणि अ‍ॅलेक्सला विविध ठिकाणी बसण्यासाठी खुर्च्या आहेत.

जगात सर्वात मोठा धर्म आहे मानवता आणि यासाठी प्राण्यासाठी प्रत्येक महिन्याला 1 लाख रुपयांपेक्षा जास्त आपल्या पगारातील पैसे खर्च करतो, याचाही ते आवर्जून उल्लेख करतात. अ‍ॅलेक्सच्या कुटुंबात मांजर, ससा, मासे, बदक, पक्षी इत्यादीही या घरात राहतात. ते रस्त्यावरील कुत्रे आणि गायींच्या आहाराची व्यवस्था करतात. शमीम यांच्या कुटुंबात एकूण 11 भाऊ-बहीण आहेत. यामध्ये चौघे जण याचप्रकारे प्राण्यांची काळजी घेत आहेत. डॉ. शमीम अविवाहित आहेत. अ‍ॅलेक्स या श्वानालाच ते आपला मुलगा मानतात.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news