मृत्यूनंतर काय घडले हेही सांगितले अन् डॉक्टर हादरले | पुढारी

मृत्यूनंतर काय घडले हेही सांगितले अन् डॉक्टर हादरले

वॉशिंग्टन : मृत्यू हा माणसाच्या आयुष्याचा शेवट असतो. त्यानंतर काहीही उरत नाही, असे मानले जाते. तथापि, अमेरिकेतून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. तिथे हृदयविकाराच्या धक्क्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. डॉक्टरांनीही त्याला मृत घोषित केले, पण आश्चर्य म्हणजे काही वेळातच ती व्यक्ती पुन्हा जिवंत झाली. एवढेच नव्हे, तर मृत्यूनंतर त्याच्यासोबत काय घडले हेही त्याने सांगितले. त्यामुळे डॉक्टरही हादरून गेले.

या 55 वर्षीय व्यक्तीचे नाव आहे केविन हिल. सध्या त्यांना मिरॅकल मॅन म्हणून संबोधले जात आहे. 2021 च्या उन्हाळ्यात त्यांच्या शरीरात पाण्याचे प्रमाण जास्त झाले. परिणामी त्याचे पाय सुजले. डॉक्टरांनी सांगितले की, त्यांच्या शरीरात काही गंभीर समस्या आहेत. यावर उपचार म्हणून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तरीही त्यांचा त्रास कमी होण्याऐवजी वाढतच गेला. त्यांची त्वचा आणि रक्तवाहिन्यांमध्ये कॅल्शिअम साठू लागले. त्यांना वेदना होऊ लागल्या. एक दिवस त्यांच्या पायातून रक्त यायला लागले आणि अवघ्या काही तासांत त्यांच्या शरीरातून तब्बल दोन लिटरहून अधिक रक्त वाहून गेले. पाठोपाठ त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. अखेर त्यांना मृत घोषित करण्यात आले. तथापि, काही क्षणांतच चमत्कार घडला. केविन अचानक जिवंत झाले. त्यांच्या शरीराची हालचाल पाहून डॉक्टर दचकलेच. त्यामुळेच केविनला द मिरॅकल मॅन असे संबोधले जात आहे.

केविन आता ठणठणीत आहेत. मृत्यूनंतर त्यांच्यासोबत घडलेल्या सर्व गोष्टी त्यांना आजही आठवतात. त्यांनी मृत्यूनंतर अनुभवलेला प्रत्येक क्षण सांगितला. ते म्हणाले की, मृत्यूनंतर मी आत्म्यासोबत गेलो होतो. माझा आत्मा शरीरात नव्हता. मला माझं शरीर दिसत नव्हते. जणू काही माझा आत्मा दुसर्‍याच्या नियंत्रणात होता. जे काही घडत होते, ते मी पाहू शकत होतो. तिथे खूप शांतता होती. मग अचानक मला असे वाटले की, मी झोपलो असून माझ्या शरीरातून होणारा रक्तस्राव थांबला आहे. आता माझ्या मृत्यूची वेळ आलेली नाही, असे मला वाटत होते.

जेव्हा विचारण्यात आले की, त्यांना पांढरा प्रकाश दिसला का, यावर केविन म्हणाले, मला असा कोणताही प्रकाश दिसला नाही. मी स्वर्गात जाणार आहे असे कोणतेही चिन्ह मला दिसले नाही. मी झोपेतून उठलो तेव्हा डॉक्टर माझ्यासोबत होते. माझ्या हृदयाचे ठोके सुरू होते आणि मला खूप शांत वाटत होते. जवळपास वर्षभराच्या उपचारानंतर आता ते घरी परतले आहेत.

Back to top button