तुर्कीमध्ये विचित्र थडग्याचा शोध | पुढारी

तुर्कीमध्ये विचित्र थडग्याचा शोध

अंकारा : तुर्कीमध्ये पुरातत्त्व संशोधकांनी एका विचित्र थडग्याचा शोध घेतला आहे. रोमन काळातील लोकांना मेलेले लोक पुन्हा जिवंत होतील याचे भय असायचे. त्या काळातील एका प्रौढ पुरुषाचा मृतदेह आधी जाळून व नंतर त्याची हाडे दफन केलेले एक थडगे आता सापडले आहे. त्यामध्ये वाकलेली 41 खिळे, 24 विटा आणि थडगे सील करण्यासाठी चुन्याच्या प्लास्टरचा एक स्तर आढळला.

नैऋत्य तुर्कीमधील सगलासोस येथील दफनभूमीत हे थडगे सापडले आहे. त्याची माहिती ‘अँटिक्विटी’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पुरुषाचे ज्या जागी दहन करण्यात आले होते त्याच्या जवळच त्याची हाडेही पुरलेली आहेत. अशी घटना रोमन काळात दुर्मीळ होती. संशोधक जोहान क्लेयस यांनी सांगितले की या पुरुषाच्या अवशेषांना एक नव्हे तर तीन वेगवेगळ्या पद्धतीने दफन करण्यात आले होते.

रोमन काळात अंत्यसंस्काराची पद्धत यापेक्षा वेगळी होती. त्यावेळी शवाचे दहन केले जात असे. त्यानंतर राख आणि हाडे कलशात भरून या कलशाचे दफन केले जाई. मात्र, आता जी हाडे मिळाली आहेत त्यावरून असे दिसते की मृत व्यक्तीचे दहन आणि दफन एकाच ठिकाणी झाले होते. याठिकाणी एक विणलेली टोकरी, भोजनाचे अवशेष, एक नाणे, चिनी माती आणि काचेचे भांडेही सापडले आहे. तिथे खिळ्यांचे काय प्रयोजन होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कदाचित हा जादुटोण्याचा काही भाग असू शकतो.

Back to top button