अ‍ॅनिमियावर डाळिंब ठरते गुणकारी | पुढारी

अ‍ॅनिमियावर डाळिंब ठरते गुणकारी

नवी दिल्ली : रक्ताची चाचणी केल्यावर अनेकांना असे दिसून येते की त्यांच्या रक्तामध्ये हिमोग्लोबिनची पातळी निश्चित मर्यादेपेक्षा कमी आहे. विशेषतः महिलांमध्ये हिमोग्लोबिन कमी असण्याची समस्या अधिक प्रमाणात आढळून येते. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेकडून भारतात झालेल्या पाहणीनुसार सुमारे 57 टक्के महिला अ‍ॅनिमियाच्या समस्येशी झुंजत आहेत आणि सुमारे 27 टक्के पुरुषांनाही अ‍ॅनिमियाची समस्या आहे. ही समस्या दूर करण्यासाठी डाळिंबाचे सेवन गुणकारी ठरू शकते असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

अ‍ॅनिमिया होण्याचे कारण म्हणजे शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता. त्यामुळे अशक्तपणा, लोहतत्त्वाची कमतरता, चक्कर येणे, त्वचा पिवळी पडणे, थकवा आणि दम लागणे अशा समस्या निर्माण होतात. शरीरातील तांबड्या रक्तपेशी कमी होतात. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी योग्य आहार असणे महत्त्वाचे ठरते. त्यासाठी फळे व भाज्यांचे सेवन करणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वाधिक उपयुक्त आहेत डाळिंब. त्यामुळे आपल्या शरीरातील रक्तसंचारही वाढतो तसेच रक्ताची शुद्धीही होते.

डाळिंबामध्ये मोठ्या प्रमाणात ‘सी’ जीवनसत्त्व, ‘के’ जीवनसत्त्व, फायबर, पोटॅशियम आणि प्रोटिन असते. तसेच यामध्ये आयर्न म्हणजेच लोहाचे प्रमाणही अधिक असते. त्याचा लाभ अ‍ॅनिमियाची समस्या दूर करण्यासाठी होतो. आपले शरीर केवळ 3 टक्के आयर्नच शोषित करू शकते. डाळिंबात ‘क’ जीवनसत्त्व असल्याने आपले शरीर आयर्नला सहजपणे शोषून घेऊ शकते. रोज एक डाळिंब खाणे किंवा त्याचा ज्यूस पिणे हे शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी तसेच हृदयाच्या आरोग्यासाठीही लाभदायक ठरते.

Back to top button