प्लॅटिपससारख्या प्राण्याच्या जीवाश्माचा शोध | पुढारी

प्लॅटिपससारख्या प्राण्याच्या जीवाश्माचा शोध

लंडन : संशोधकांनी तब्बल 7 कोटी वर्षांपूर्वीच्या प्लॅटिपससारख्या प्राण्याच्या जीवाश्माचा शोध लावला आहे. एका प्राचीन सरोवराच्या काठी केलेल्या उत्खननात या छोट्याशा प्राण्याचे जीवाश्म सापडले. हे प्राचीन सरोवर सध्याच्या अर्जेंटिनामध्ये आहे. या शोधामुळे अंडी घालणार्‍या सस्तन प्राण्यांच्या इतिहासावर नवा प्रकाश पडू शकतो असे संशोधकांना वाटते.

या प्राण्याला ‘पॅटागोरिंचस पास्कली’ असे शास्त्रीय नाव देण्यात आले आहे. अंडी घालणार्‍या सस्तन प्राण्यांच्या कुळातील हे सर्वात प्राचीन जीवाश्म आहे. या कुळातील प्राण्यांना दक्षिण अमेरिकेत ‘मोनोट्रिम्स’ या नावाने ओळखले जाते. अशा प्रकारचे हे विचित्र सस्तन प्राणी कसे विकसित झाले याबाबतची नवी माहिती या जीवाश्मावरून समजू शकेल. सध्या मोनोट्रीम्सच्या पाच प्रजाती अस्तित्वात आहेत. त्यामध्ये प्लॅटिपस, आखुड चोचीचे इचिडना आणि लांब चोचीच्या इचिडनाच्या तीन प्रजातींचा समावेश होतो.

या सर्व प्रजाती प्रामुख्याने ऑस्ट्रेलियात आढळतात. मात्र, या प्राचीन प्राण्याचे जीवाश्म ऑस्ट्रेलियात नव्हे तर अर्जेंटिनात सापडले आहे, हे विशेष! त्यामुळे या प्राण्यांचा विकास सुरुवातीला नेमका कुठे झाला हे आता पाहिले जात आहे. लाखो वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका आणि अंटार्क्टिकाचा भूखंड एकत्रच होता व या महाखंडाला ‘गोंडवाना’ असे म्हटले जाते. 180 दशलक्ष वर्षांपूर्वी हा महाखंड फुटला. मात्र, 66 दशलक्ष वर्षांपूर्वीपर्यंत हे खंड पूर्णपणे वेगळे झाले नव्हते. अशा काळातच ही प्राचीन प्रजाती विकसित झाली असावी.

Back to top button