नेदरलँडमध्ये सापडला एक हजार वर्षांपूर्वीचा खजिना | पुढारी

नेदरलँडमध्ये सापडला एक हजार वर्षांपूर्वीचा खजिना

अ‍ॅम्स्टरडॅम : नेदरलँडमधील एका डच इतिहासकाराला एक हजार वर्षांपूर्वीचा सोन्याचा खजिना सापडला आहे. या खजिन्यात चार कर्णफुले, सोन्याच्या पानांच्या दोन पट्ट्या आणि चांदीच्या 39 नाण्यांचा समावेश असतो. याबाबतची माहिती डच नॅशनल म्युझियम ऑफ अँटिक्विटीजने दिली आहे.

म्युझियमच्या संचालकांनी सांगितले की या खजिन्यातील सोन्याचे दागिने अत्यंत दुर्लभ आहेत. हा खजिना कुणी व का जमिनीत पुरला हे रहस्यच आहे. 27 वर्षांचे लोरेंजो रुइजर वयाच्या दहाव्या वर्षापासून खजिन्याचा शोध घेत असत. त्यांनी 2021 मध्ये मेटल डिटेक्टरचा वापर करून नेदरलँडच्या हुगवुड नावाच्या छोट्याशा शहरात या खजिन्याचा शोध घेतला होता. त्यांनी सांगितले की इतका बहुमुल्य खजिना शोधणे माझ्यासाठी खासच बाब होती. अशा शोधाची मी कधी कल्पनाही केली नव्हती. त्यामुळे दोन वर्षे या खजिन्याची माहिती गुप्त ठेवणे कठीण होते.

या दोन वर्षांच्या काळात खजिन्यातील वस्तूंची साफसफाई, तपासणी आणि संशोधनाचे काम सुरू होते. म्युझियमच्या टीमला या संशोधनासाठी इतका वेळ हवा होता. त्यानंतर हे स्पष्ट झाले की हा खजिना एक हजार वर्षांपूर्वीचा आहे. या खजिन्यातील सर्वात अलीकडचे नाणे हे सन 1250 च्या आसपासचे असू शकते. त्याच काळात हा खजिना लपवला गेला असावा. तेराव्या शतकात फ्राइस्लँड आणि हॉलंडदरम्यान एक युद्ध झाले होते. या युद्धावेळी हुगवूड एक महत्त्वाचे केंद्र होते. त्या काळातच एखाद्या श्रीमंत व्यक्तीने आपला खजिना असा दडवला असावा.

Back to top button