अंतराळात सापडले ‘पाणी’! | पुढारी

अंतराळात सापडले ‘पाणी’!

वॉशिंग्टन : पृथ्वीवर पाणी कसे आले याचे कुतुहल नेहमीच संशोधकांना राहिलेले आहे. काही धुमकेतू व लघुग्रहांमुळे पृथ्वीवर पाण्याचे अस्तित्व निर्माण झाले असावे असे मानले जाते. आता संशोधकांनी पृथ्वीपासून 1300 प्रकाशवर्ष अंतरावर एक तारा शोधला आहे. उत्तर चिलीमधील अटाकामा लार्ज मिलीमीटर ऐरे ऑफ टेलिस्कोप किंवा ‘एएलएमए’च्या सहाय्याने या तार्‍याचे निरीक्षण करण्यात आले. या तार्‍याला ‘व्ही 883 ओरियोनिस’ असे नाव देण्यात आले आहे. या तार्‍याच्या भोवती धूळ आणि वायूची एक तबकडीच आहे. त्यामध्येच संशोधकांना पाण्याचे बाष्पही आढळले आहे.

हे पाणी तार्‍याच्या निर्मितीपासून ते त्याच्या भोवती फिरणार्‍या ग्रहांच्या निर्मितीपर्यंतचा प्रवास करते. ‘नेचर’ या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की सूर्याच्या अशाच ग्रह बनवणार्‍या डिस्कमधून बनलेल्या धूमकेतूंनी पृथ्वीवर पाणी आणले असावे. विशेष म्हणजे आपल्या पृथ्वीवर असलेले पाणी हे सूर्यापेक्षाही अधिक जुने असल्याचे अनेक संशोधकांना वाटते.

सूर्याचे वय 4.6 अब्ज वर्षे आहे. नॅशनल रेडियो अ‍ॅस्ट्रॉनॉमी ऑब्झर्व्हेटरीतील एक खगोलशास्त्रज्ञ जॉन जे. टोबिन यांनी सांगितले की आता आम्ही सूर्याच्याही निर्मितीपूर्वी आपल्या सौरमंडलात पाण्याच्या उत्पत्तीचा शोध घेऊ शकतो. सर्वसाधारणपणे हायड्रोजनचे दोन अणू आणि ऑक्सिजनच्या एका अणूपासून पाणी बनते.

मात्र, संशोधकांच्या टीमने ‘व्ही 883 ओरियोनिस’ मध्ये काही बदल पाहिले आहेत. त्यामध्ये संशोधकांना मोठ्या प्रमाणात पाण्याचे अस्तित्व आढळले ज्यामध्ये हायड्रोजनचा एक अणू मोठ्या आयसोटोपमध्ये रूपांतरीत होतो. त्याला ‘ड्यूटेरियम’ असे म्हटले जाते. ज्या पाण्याचा आपण वापर करतो ते आणि असे वजनदार पाणी वेगवेगळ्या स्थितीत बनतात. पाण्याचे अणू बनण्यास कधीपासून सुरुवात झाली याचा आता संशोधक शोध घेत आहेत.

Back to top button